

नाशिक : पांडवलेणी परिसरातील ज्ञानपीठ सोसायटीसमोर रविवारी (दि. १३) रात्री मद्यसेवनानंतर झालेल्या वादातून टोळक्याने दोन मित्रांवर तलवार व धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी तलवारी हवेत फिरवत चारचाकी वाहनांच्या काचा फोडत परिसरात दहशत माजवली. गुन्हे शाखा युनिट एक व इंदिरानगर पाेलिसांनी तपास करीत आठपैकी सात संशयितांना ताब्यात घेतले असून, कबुतरांच्या वाटपावरून वाद झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
राम उर्फ रामदास नारायण बोराडे (२०, रा. ढेमसे मळा, पाथर्डी फाटा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याचा चुलतभाऊ राजेश सुदाम बोराडे (२०, रा. ज्ञानगंगा सोसायटी, पांडवलेणीजवळ) हा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. याप्रकरणी साहिल राजन सिंग (२०, रा. संभाजी स्टेडियममागे) याने इंदिरानगर पाेलिसांत संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. संशयित शौकत फरीद शेख (१९, रा. पांडवलेणी पायथ्याजवळ), नौशाद हाजी सय्यद (१९, रा. सिन्नर), नफीज रफिक शेख उर्फ नफ्या (२२, रा. साइडपार्क, इंदिरानगर), विजय सुनील माळेकर (१९, रा. दामाेदर चाैक, पाथर्डी फाटा), रोहित चंद्रकांत पालवे (रा. पांडवलेणी), नितीन विठ्ठल घुगे (१९, रा. नवले चाळ, पाथर्डी फाटा) यांच्यासह दोन विधिसंघर्षित मुलांविरोधात खून, प्राणघातक हल्ला, जमाव जमवून मालमत्तेचे नुकसान यांसह भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदिरानगर पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर संशयित विजय माळेकर फरार आहे.
रविवारी (दि. १३) रात्री 10 ते 11.30 च्या सुमारास ज्ञानपीठ साेसायटीच्या ए-३ समाेर राम हा मित्रांसह गप्पा मारत होता. मद्यसेवन करताना रामने संशयितांना विचारले होते की, तुम्ही नेत्रदीपचे दोन कबूतर पेटीवर का ठेवले? त्यावर अल्पवयीन संशयित व नौशादने तू २ ऐवजी १० कबूतर घे असे सांगितले. त्यावरून राम व संशयितांमध्ये वाद झाला. मद्याच्या नशेत असल्याने हाणामारी झाली व त्यात संशयितांनी हत्याराचा वापर करून राम आणि राजेशवर हल्ला केला. तर, विधिसंघर्षित मुलाने सिंगच्या तोंडावर काचेची बाटली फेकून मारल्याने तोदेखील जखमी झाला.
संशयित टोळक्याने राम व राजेशवर हल्ला करीत तेथून पळ काढला. मात्र जाताना त्यांनी हवेत तलवारी फिरवत आरडाओरड केला. तसेच परिसरातील चारचाकी वाहनांच्या काचा शस्त्रांनी फोडून परिसरात दहशत केली. संशयित पळून जात असल्याची घटना परिसरातील 'सीसीटीव्ही'त कैद झाली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.