

नाशिक : मागील काही दिवसांपासून शहरात हाणामाऱ्या आणि खुनाचे प्रकार सातत्याने समोर येत असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसाढवळ्या गुंड हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सिडको आणि नाशिक रोड भागात याबाबतच्या दोन घटना समोर आल्या असून, गुंडांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही दिवसांपासून शहरात हत्येच्या घटनांचे सत्र सुरू आहे. तर हाणामारीचे प्रकार नित्याचेच झाले आहे. अंबड पोलिस ठाणे हद्दीत गुंडांच्या टोळक्याने हातात कोयते, चाकू घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार रविवारी (दि. १) समोर आला असून, पोलिसांनी याप्रकरणी प्रमुख सराईत आरोपींसह दहा ते बारा जणांची ओळख पटविली आहे.
मोहम्मद फेसल वाहिद शेख (२८, पाण्याच्या टाकीजवळ, हनुमान मंदिर, अंबड-लिंक रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.१) रात्री १० च्या सुमारास अंबड, संजीवनगर येथी पाण्याच्या टाकीजवळून रस्त्याने पायी जात असताना, चार मोटारसायकलींवर आलेल्या दहा ते १२ टवाळखोरांनी हातात कोयते, चाकू घेऊन जोरजोरात ओरडत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादीच्या डाव्या कानावर चाकू मारून कान कापला. तसेच पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली. यावेळी रस्त्यावरून चालत येणाऱ्या अमीरूल शेख यांच्याही डोक्यात व दोन्ही हातांवर, पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी टवाळखोरांनी साईरूद्रा अपार्टमेंटमधील वाहनांच्या काचाही फोडल्या.
दुसरा प्रकार नाशिकरोड भागात उघडकीस आला. सिद्धार्थ प्रकाश जगताप (३६, ढिकले नगर, जेलरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी (दि.१) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीने त्यांची कार (एमएच ०४, जीई ९६५१) रस्त्याच्या कडेला पार्क करून मित्र साहिल खरात आणि मंगेश उतपुरे यांच्याशी गप्पा मारत असताना जेलरोड पाण्याच्या टाकीकडून तीन ते चार मोटारसायकलवर ट्रिपल सिट आलेल्या ९ ते १० अज्ञात टवाळखोर त्यांच्या दिशेने आले. काहीही कारण नसताना 'तुम्ही येथे का उभे आहात. रस्ता का तुमच्या बापाचा आहे काय?' असे बोलून शिविगाळ केली. तसेच फायटरने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याला तसेच डोक्याला दुखापत केली. कोयत्याने कारच्या काचा फोडल्या. बोनटवर कोयते मारून नुकसान केले. याप्रकरणी अद्यापपर्यंत एकाही संशयित आरोपीस बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, या दोन्ही घटनांमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तत्काळ याप्रकरणी कारवाई करून गुंडांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शहरात खुनाचे सत्र सुरू असतानाच, हाणामारीच्या घटनांनी दहशतीचा प्रयत्न गुंडांकडून केला जात आहे. शहरातील सर्वच पोलिस ठाण्यात दररोज हाणामारीचे गुन्हे दाखल होत आहेत. यातील काहीच संशयितांना बेड्या ठोकण्यात येत असून, इतर मात्र पसार होण्यात यशस्वी होत असल्याचेही दिसून येत आहे.