

नाशिक : मागील काही दिवसांपासून फसवणूकीच्या सातत्याने घटना समोर येत असून, अशाच एका महाठगास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कर्ज मंजूर करून देत त्यातील पैशांतून मौजमजा करणारा संशयित सुमीत संजय देवरे (३०, रा. अथर्व पार्क, शरदचंद्र पवार मार्केट यार्डच्या मागे, सद्गुरुनगर, नाशिक, मुळ रा. करंजाळ, ता. बागलाण) याने नाशिकसह इतर अनेकांना गंडविले आहे. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल असून, २५ जणांना गंडा घातल्याचे आतापर्यंत समोर आले आहे.
मोबाइलवरून कमी अधिक रकमेचे लोन मंजूर करून देण्याचे सांगत अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी संशयित देवरे व त्याचे मित्र प्रतिक सोनटक्के, संतोष कांबळे यांच्यावर गंगापूर व म्हसरूळ पोलिसात दोन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाच्या तपासात पाेलिसांनी देवरेचा मित्र व प्रकरणांत मध्यस्थी करणाऱ्या एकाला यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, देवरे पसार असल्याने त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु हाेते. त्यातच, देवरे हा नाशिकमधील बळी मंदिराजवळ येणार असल्याची माहिती समजली. त्यानुसार, खंडणी विराेधी पथकाने इगतपुरी ते बळी मंदिरापर्यंत (आडगाव शिवार) सापळे रचले. तेव्हा देवरे हा बळी मंदिराजवळ येताच रात्री ९ वाजता त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचा ताबा गंगापूर पोलिसांकडे सोपविला असून, त्याचे आणखी गुन्हे प्रकाशझोतात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देवरे व साथीदारांनी संगनमताने हा घाेटाळा केल्याचे पुरावे पाेलिसांना मिळाले आहेत. ज्यांच्या नावावर कर्ज घेतले आहे, त्यांना आता संबंधित बँक व संस्था कर्जाचे हप्ते भरण्यासाठी संपर्क करत आहे. तर, देवरेने इतरांच्या नावे कर्ज स्वरुपात रक्कम व माेबाईल घेऊन त्यांचा विश्वास संपादन करुन कर्जाची पूर्ण रक्कम न देता एक लाखाचे कर्ज मंजूर झाले तर, संबंधिताला १० ते १२ हजार रुपयेच दिल्याचे समाेर आले आहे.
देवरे हा मुळचा बागलाणच्या करंजाळचा असून, मागील नऊ वर्षांपासून तो पंचवटीत वास्तव्यास आहे. तो अविवाहित असल्याचे समजते. ज्या मित्रांना व ओळखीतील नागरिकांना इंन्स्टंट कर्ज हवे आहे, त्यांना ताे विश्वासात घेऊन लाेन मंजूर करुन देताे असे सांगायचा. त्यासाठी संबंधितांची कागदपत्रे घेत त्यांच्याच नावाने लोन मिळविल्यावर आलेले पैसे स्वत:च्या व मध्यस्थींमार्फत इतर खात्यावर वर्ग करुन मुंबईत जाऊन माैजमजा करत हाेता. त्यासाठी त्याने अनेकांच्या नावावर कर्ज घेवून २० पेक्षा अधिक आयफाेन व व्हिओ माेबाईल खरेदी केले आहेत. हे फाेन काही दिवसांतच ताे ४० ते ६० हजार रुपयांत विक्री करुन आलेल्या पैशांतून मद्यपान व इतर चैनीच्या वस्तू घेऊन हाैस भागवत हाेता.