

मनमाड (नाशिक) : शहरातील कॅम्प भागात व्यापाऱ्याच्या घरात चोरी करीत चोरट्यांनी एक किलो ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि आठ लाखांची रोकड चोरून नेली. कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी आपला कार्यभाग उरकला. व्यापारी बुधवारी (दि. ११) घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
मनमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डमरे कॉलनीजवळ मुर्तुजा रस्सीवाला (बोहरी) या व्यापाऱ्याचा बंगला आहे. संपूर्ण कुटुंबीय रविवारपासून (दि. ८) बाहेरगावी गेले होते. ते बुधवारी परतले. तेव्हा बंगल्यामागील खिडकीचे गज कापलेले निदर्शनास आले. आत खातरजमा केली असता, घरफोडी झाल्याचा प्रकार उघड झाला. चोरट्यांनी कपाटातील एक किलो ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (ज्यांची चालू बाजारभावानुसार सव्वा कोटी किंमत होते) आणि आठ लाखांची रोकड पळविली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नाशिकहून श्वान आणि फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र ठोस असं काही हाती लागले नाही. रस्सीवाला कुटुंबीय घराबाहेर आणि घरात किमती एेवज असल्याची माहिती चोरट्यांना आधीच असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.
शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकीचोरी, चेनस्नॅचिंग, छोट्या - मोठ्या चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. शहराची लोकसंख्या आणि व्याप्ती पाहता पोलिसबळ अपुरे पडत आहे. यामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढत चालल्याचा सूर उमटत आहे. संवेदनशील शहरातील कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन शासनाने पोलिसांची संख्या वाढवावी आणि गुन्हेगाराचा बीमोड करावा, अशी मागणी होत आहे.