

नाशिक : अंबड औद्याेगिक वसाहतीतील गोडाउन फोडून काॅपर केबल वायरची चाेरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट-२ ने केली असून, अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला. पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलिस हवालदार प्रकाश महाजन यांना गुप्त बातमीदारांमार्फत, अंबड औद्योगिक वसाहतीतील डी. एस. केबल ॲण्ड स्वीच गेअर येथून वायरची चोरी केल्याची माहिती मिळाली होती. ही चोरी संशयित सुखदेव झोले, योगेश मरळ व त्याच्या साथीदारांनी केल्याचे समजले. तसेच सुखदेव झोले हा दुचाकीवरून सातपूर, अशोकनगर येथील प्रगती शाळा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्याकडून कायदेशीर कारवाईचे आदेश प्राप्त करून पोलिस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, पोलिस हवालदार मनोहर शिंदे, सुनील आहेर, अतुल पाटील, अंमलदार महेश खांडबहाले, सुनील खैरनार आदींच्या पथकाने घटनास्थळी खात्री केली तेव्हा संशयित सुखदेव उर्फ संतू झोले (४५, रा. प्रबुद्धनगर, महालक्ष्मी चौक, सातपूर) आढळून आला.
त्याच्याकडे चौकशी केली असता, संशयित साथीदार कृष्णा पांडुरंग वाळके (२६, रा. प्रबुद्धनगर, सातपूर), योगेश मराळ (३६, रा. गावपाचाळी, ता. त्र्यंबकेश्वर), राजू काशीद यांच्या साथीने केबल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच एमएच १५, जेएन ४६५१ या क्रमांकाच्या रिक्षाने त्र्यंबकेश्वरजळील पिंपळद येथे केबल जाळून त्यातील कॉपर वायर अंबडगाव येथील भंगार व्यावसायिक संजय सकट याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पंचनामा करून संशयित झोलेला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दुचाकी, भंगार व्यावसायिक संजय पांडुरंग सकट (२०, रा. सोनाली वाइन शॉपमागे, अंबड) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील काॅपर तार असा एकुण एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यात सहभागी असलेला संशयित रिक्षाचालक प्रमोद संपत म्हस्के (२२, रा. श्वेता प्राइड, लक्ष्मीनगर, अंबड) याच्यासह रिक्षा व मोबाइल असा दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला. तसेच झोलेचे साथीदार संशयित योगेश मराळ, कृष्णा वाकळे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण तीन लाख १० हजारांचा मुद्देेमाल हस्तगत केला. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, संशयितांना पुढील तपासासाठी अंबड पोलिस ठाणे अंतर्गत चुंचाळे पाोलिस चौकी येथे हजर केले आहे.