

नाशिक : स्वमालकीची २० गुंठे शेतजमीन असताना कागदोपत्री १ हेक्टर ७६ आर इतके क्षेत्रफळ असल्याचे दाखवून जागा मालकासह इतरांनी बनावट कागदपत्रे, त्यावर वकीलामार्फत दस्त तयार करून जमिन खरेदी करणाऱ्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तालुका पाेलिस ठाण्यात सात जणांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक अतिक चिराग उद्दीन खतिब (रा. कोकणीपुरा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित जाबीरखान तडवी (रा. मालेगाव), निषांत मनिष अग्रवाल (रा. सिरीन मीडोज, गंगापूर रोड), दर्शन रमणलाल बंब, मनोज गंगाधर बुरकुले (रा. सुंदरबन कॉलनी), सत्तार शेरबानो सलीम, मरीयमबी बी. (दोघे रा. येवला) आणि ॲड. ए. आय. शेख यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संशयितांनी पुर्वनियोजीत कट रचून त्यांच्या लाभात तयार झालेल्या खोट्या व बनावटी दस्तऐवजांच्या आधारे खतिब यांची फसवणूक केली. जागा मालकास दोन पत्नी असताना त्यांनी कागदोपत्री एकच पत्नी दाखवत तिचेच वारस कायदेशीर असल्याचे भासवले. तसेच २० गुंठे जागा नावावर असताना त्याहून पाच पट जागा स्वमालकीची असल्याचे सांगून विक्रीचा प्रयत्न केला. खतिब व इतरांविरोधात जुलै महिन्यात अंबड पोलिसात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अटकपूर्व जामिनासाठी खतिब यांनी अर्ज केला. त्यावर न्यायालयात ॲड. शेख यांच्या जबाबानुसार २०११ चे वाटणीपत्र जे चार स्वंतत्र मुखत्यारपत्राच्या आधारे नोंदवले ते कायदेशीर असल्याचे सांगितल्याने खतिब यांना अटकपूर्व मंजूर झाला. त्याचवेळी न्यायालयाने तक्रारदाराविराेधात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असल्याचे निकालात म्हटले हाेते. त्यानुसार खतिब यांनी सात संशयितांविरोधात तक्रार दिली असता तालुका पाेलिस ठाण्यात बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.