

घोटी (नाशिक) : घोटी पोलिस ठाणे हद्दीतील आवळी दुमाला येथे 2018 मध्ये पाचवर्षीय मुलीचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
मे 2018 मध्ये आवळी दुमाला येथे घराचे बाहेर ओट्यावर खेळत असलेल्या पाचवर्षीय बालिकेचे आरोपी गोपीनाथ दत्तू जमधडे (23, रा. आवळी, ता इगतपुरी) याने चॉकलेटचे अमिष देत लैंगिक चाळे करण्याचे उद्देशाने अपहरण केले होते. मात्र, बालिकेला घेऊन जाताना तिने रडण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावातील लोक जमा होतील या भीतीने आरोपीने बालिकेच्या डोक्यात दगड मारून तसेच गळा दाबून खून करत प्रेत खड्डा करून पुरून टाकले होते.
या प्रकरणी घोटी ठाण्यात अपहरण, खून व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायलयात प्रकरण सुरू असताना न्यायाधीश रेड्डी यांनी आरोपीस वेगवेगळ्या कलमाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे यांनी केला होता. तर तत्कालीन तपास अधिकारी पंकज भालेराव, पोलिस हवालदार शीतल गायकवाड यांनी साहाय्य केले होते. सरकारी अभियोक्ता म्हणून सांगळे यांनी काम पाहिले. या कामी घोटी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद पाटील, पोलिस हवालदार मारुती बोऱ्हाडे यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन केले. पैरवी अधिकारी म्हणून भोये व आगोणे यांनी काम पाहिले.