Nashik Crime | अवैध सावकार पिता-पुत्राविरोधात गुन्हा; पीडितांना तक्रार करण्याचे आवाहन

मायलेकींचा विनयभंग
रोहित कुंडलवाल
रोहित कुंडलवालPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : कर्जदार महिलेकडून जादा व्याजदराने वसुली करूनही सावकारांनी महिलेसह तिच्या पतीला धमकावले आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तसेच पीडित दाम्पत्याला जिवे मारण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून कैलास कुंडलवाल आणि रोहित कुंडलवाल (34, रा. उदय कॉलनी, मखमलाबाद रोड) या पिता - पुत्राविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. 13) अवैध सावकारी करणार्‍या सिडकोतील वैभव देवरेसह टोळीवर गुरुवारी मकोका कायद्यानुसार कारवाई केली. त्यातच हुंडीवाला लेनमधील 40 वर्षीय महिला व्यावसायिकाची नवी तक्रार पुढे आली. पीडितेने डिसेंबर 2022 मध्ये 15 लाखांचे कर्ज घेतले होते, मात्र संशयितांनी 38 लाख रुपये व्याज वसूल करूनही आणखी 50 लाखांची मागणी केली होती. संशयित रोहितने पीडितेला कारमध्ये जबरदस्ती बसवून गंगापूर रोडवरील जिममध्ये नेत विनयभंग केला. त्यानंतर पीडितेसह तिच्या पतीला पंचवटीतील भक्तिधाम सिग्नलजवळ भेटण्यास बोलावून पिस्तुलाचा धाक दाखवत 50 लाखांसाठी जिवे मारण्याची धमकी दिली. बुधवारी (दि. 12) पीडितेच्या दुकानात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत धमकावल्याचा आरोप आहे. भद्रकाली पोलिसांनी रोहितला अटक करून पोक्सो, विनयभंग, खंडणी आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी इतर पीडित नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन केले. न्यायालयाने रोहितला 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, या प्रकरणी आणखी तक्रारी समोर येण्याची शक्यता आहे. शहरात अवैध सावकारीचे वाढते प्रकार बघता पोलिसांनी या सावकारांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.

यादी कोणाची?

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या पथकाने संशयित रोहितला अटक केली. झडतीत त्याच्याकडे मोबाइल, रोकड आणि 55 जणांची नावे असलेला कागद सापडला. कागदाच्या एका बाजूने 26 व दुसर्‍या बाजूने 29 अशी एकूण 55 जणांच्या नावांची यादी दिसून आली. घरातूनही छोटी डायरी हाती लागली आहे. प्रत्येक पानावर वेगवेगळ्या व्यक्तींची नावे, रकमा, दिनांक व स्वाक्षरी केलेली आढळली आहे. यातून खासगी सावकारीचा संशय बळावला आहे.

पिस्तुलासह नोटा मोजण्याचे मशीन जप्त

पोलिसांनी संशयिताकडून तीन मोबाइल, गळ्यातील सोन्याचा गोफ, 15 हजारांची रोकड, कार (एमएच 20, एफयू 6800), पिस्तुलासह सहा जिवंत काडतुसे तसेच नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले आहे. रोहित व त्याच्या वडिलांनी अनेकांना व्याजाने पैसे दिल्याचा संशय असून, यात इतरही 6 ते 7 संशयितांचा सहभाग असल्याचा संशय वर्तवला जात आहे.

रोहित राजकीय पक्षाशी संबंधित

रोहित गेल्या आठ वर्षांपासून आरके फाउंडेशनच्या नावाने कार्यरत आहे. त्याचे मधुबन कॉलनीत संपर्क कार्यालय असून, सोशल मीडियावर त्याने भाजप कामगार आघाडी सरचिटणीस व युवा मोर्चाशी संबंधित पोस्टर तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गिरीश महाजन यांच्यासमवेतचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, संशयित कैलास कुंडलवार हे राष्ट्रीयीकृत बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. रोहितने नाशिक मनपा निवडणुकीत आपल्या आईला उमेदवार म्हणून उभे करण्याची तयारी केली असल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news