

सिडको (नाशिक) : कंपनीच्या दोन संचालकांनी संगनमत करून बनावट दस्त तयार करीत अन्य संचालकांची फसवणूक करण्याबरोबरच 28 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकर उघडकीस आला. या प्रकरणी चिराग विलास पाटील (38, रा. अभियंतानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक अँडी नवाज खान आणि मथिवाथनी सेल्वासुंदरम यांच्यावर २८ कोटी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा अंबड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इव्हा कंपनीने इंरिएडेड या संस्थेकडून १४.२३ कोटीचे कर्ज घेतले होते. कर्जासाठी संचालकांनी वैयक्तिक हमी दिली होती. त्यामध्ये मथिवाथनी आणि अँडी नवाज खान यांच्यावर 6.9 कोटींचे दायित्व होते. मात्र, या दोघांनी केवळ २.१५ कोटी रुपये भरून उर्वरित रक्कम भरण्यास टाळाटाळ केली. कंपनीच्या सीईओ ऐश्वर्या देव पेंदयाला यांना कंपनीच्या ई- मेलमध्ये संशयास्पद पत्र आढळून आल्याने तपासणी केली असता मथिवाथनी आणि अ ँडी नवाज खान यांनी कंपनीच्या इतर संचालकांच्या सहीचा बनावट वापर करून आरबीआयला खोटे दस्त तयार करत पत्र पाठविल्याचे स्पष्ट झाले. याबाबत विरोध केल्यानंतर अँडी खान आणि मथिवाथनी यांनी कंपनी साेडून देण्याची धमकी देत 10 एप्रिल 2025 रोजी 16 कोटी आणि 29 मे 2025 12 कोटींची खंडणी कंपनीकडे मागितली. इंरिएडेड संस्थेकडून दिलेली वैयक्तिक हमीही रोखू अशी धमकी ई- मेलने पाठविली होती. याप्रकरणी चिराग पाटील यांनी फिर्याद दिल्याने अंबड ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करत तसेच धमकी देत खंडणी मागितली आहे. या प्रकरणातील संशयित सध्या श्रीलंकेत असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल.
राकेश हांडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंबड पोलिस ठाणे] ,नाशिक.