

निफाड ( नाशिक ) : शेतजमीन मोजणीसाठी साडेतीन लाखांची लाच घेणाऱ्या शिपायाला शनिवारी (दि. 8) निफाड न्यायालयात हजर केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. बी. गुजराथी यांनी 11 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शुक्रवारी (दि.7) निफाड येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील शिपाई नीतेंद्र काशीनाथ गाडे (35) याला लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली हाेती.
तालुक्यातील दीक्षी येथे तक्रारदार यांच्या मावशीची शेतजमीन असून या जमीन मोजणीसाठी त्यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दि. 25 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी मोजणी झाली होती. परंतु हद्दीच्या खुणा दाखवणे बाकी होते. त्यानंतर शिपाई नीतेंद्र काशीनाथ गाडे (35) याने आपल्या ओळखीतून दि. 7 मार्च रोजी हद्दी खुणा व नकाशे करून काम पूर्ण करून देण्यासाठी दि. 6 मार्च रोजी चार लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती साडेतीन लाख रुपये ठरले होते. मात्र, रक्कम घेताना शिपाई गाडेला अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिला वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मीरा आदमाने व पोलिस हवालदार पळशीकर, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाने केली.