

वावी : सिन्नर - शिर्डी महामार्गालगत असणार्या पांगरी खुर्द येथे मंगळवारी (दि. 18) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत हनुमान मंदिरात चोरी करून साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सरपंच संदीप शिंदे यांनी वावी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे मंदिरामधील शंकराच्या पिंडीवर असलेला तांब्याचा मोठा कलश, दानपेटीतील अंदाजे 20 हजार रुपयांची रक्कम, अहुजा कंपनीची साऊंड सिस्टिम, 15 किलो वजनाचा पितळी मोठा घंटा, तीन किलो वजनाचे तीन छोटे घंटे, तांब्याचा मोठा गडवा व ताट अशा मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या.
सकाळी देवदर्शनासाठी येणार्या नागरिकांच्या लक्षात ही चोरीची बाब लक्षात येताच पोलिसपाटील व सरपंच संदीप शिंदे यांना याबाबतची माहिती सांगण्यात आली. चोरी झाल्याचे लक्षात येताच सरपंच शिंदे यांनी वावी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार देवीदास माळी घोडे अधिक तपास करीत आहेत.