

नाशिक : मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगरानी यांचा स्वीय सहायक असल्याचे भासवून सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयिताला गुंडाविराेधी पथकाने लासलगाव येथून पकडले. प्रकाश धोंडू कदम (४७, रा. बदलापूर, जि. ठाणे) असे संशयिताचे नाव आहे.
पंचवटी पोलिस ठाण्यात संकेत शिवाजी कोटकर यांच्या फिर्यादीनुसार, २०२३ साली संशयित कदमने स्वत:च्या मोठ्या ओळखी असून, संकेतसह इतरांना सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्या मोबदल्यात कदमने संकेत व इतरांकडून वेळोवेळी ७१ लाख ५० हजार रुपये घेतले होते. पैसे दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संकेत यांनी कदमविरोधात फिर्याद दाखल केली होती.
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित कदम फरार झाला होता. तो कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये स्वत:ची ओळख लपवून फिरत होता. त्यामुळे त्याचा माग काढणे अवघड झाले होते. दरम्यान, गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी मानवी व तांत्रिक कौशल्य वापरून कदम याचा माग काढला. तो लासलगाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय सूर्यवंशी, भूषण सोनवणे, गणेश भागवत व राजेश राठोड यांच्या पथकाने सापळा रचून कदमला विंचूर फाटा परिसरातून पकडले. त्याचा ताबा पंचवटी पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.