

नाशिक : लहानगी हात जोडून विनवणी करीत असताना मारहाण करीत असलेल्या मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मारहाणीबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. अशात पोलिसांनी स्वत: फिर्यादी होत, त्याला ताब्यात घेतले असून, भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रिक्षाचालकांच्या मुजोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून, पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली. शालिमार परिसरात घडलेली ही घटना समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शुक्रवारी (दि. १४) घडलेल्या या घटनेत, एक कुटुंब धूलिवंदन साजरे करून कारने (डीएल १२, सीएन २८२३) घरी परतत असताना, शालिमार चौकात संशयित रिक्षाचालक मजहर अन्वर खान (रा. कथडा, जुने नाशिक, भद्रकाली) व त्याच्या साथीदाराने संबंधित कुटुंबीयांशी हुज्जत घातली. चौकात बेकायदेशीरपणे ऑटोरिक्षा (एमएच १५, जेए ३५०४) उभी करून रिक्षाचालक मजहरने संबंधितांशी दादागिरी केली. तसेच चालकाच्या बाजूने असलेली कारची काच फोडून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी कारचालकाने मजहरची माफी मागितली. मात्र, अशातही त्याने मारहाण सुरूच ठेवली. यावेळी कारमध्ये बसलेली मुलगी हात जोडून गयावया करीत, 'मारू नका, माफी मागते' अशी वारंवार विनंती करत होती. तरीदेखील मुजोर रिक्षाचालक मजहर मारहाण करीत होता. धक्कादायक बाब म्हणजे उपस्थित नागरिकांनीही 'मारू नको, त्या व्यक्तीची फॅमिली सोबत आहे.' असे मजहरला समजावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अशातही तो मारहाण करीतच होता.
हा संपूर्ण प्रकार उपस्थित नागरिकांनी मोबाइलमध्ये कैद केला. तसेच समाज माध्यमांवर व्हायरल केला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत, पोलिस हवालदार नंदकिशोर मगर (४५, भद्रकाली पोलिस ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मजहर खान व त्याच्या साथीदाराविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दहशत पसरविणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून परिसरात धिंड काढली जाते. मग, संशयित रिक्षाचालक मजहर खान याची धिंड का काढली जात नाही. त्यानेदेखील परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याची परिसरात धिंड काढावी तसेच त्याचा रिक्षा परवाना रद्द करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या शालिमार चौकात रिक्षाचालकांची मुजोरी नित्याचीच झाली आहे. याठिकाणी वाहतूक पोलिस असतानाही रिक्षाचालक मनमानी पद्धतीने रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या करतात, प्रवाशांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात. रात्रीच्या वेळी या भागातून रिक्षाने प्रवास करणे अत्यंत धोकादायक झालेले असून, पोलिसांनी मुजोर रिक्षाचालकांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली जात आहे.