

नाशिक : देवळाली गाव, सुंदरनगर येथे कमरेला बंदूक लावून फिरत असलेल्या तरुणाला गुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी कट्टा, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
नाशिक रोड, उपनगर पोलिस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार गणेश भागवत यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, तरुण कमरेला बंदूक लावून फिरत आहे. त्यानुसर पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून जय उर्फ मारी वाल्मीक घोरपडे (२१, रा. सुंदरनगर, देवळालीगाव) याला ताब्यात घेतले. जेव्हा पोलिस आल्याची त्याला चाहूल लागली, तेव्हा त्याने सुंदरनगरकडून रोकडोबावाडीकडे पळ काढला होता. मात्र, पथकाने पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. उपनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.