

नाशिकरोड : जेल रोड येथील कॅनॉल रोडवरील मंगलमूर्तिनगर येथे गुरुवारी (दि. १७) रात्री धाडसी घरफोडीची घटना घडली. चोरट्यांनी सुमारे २२ तोळे सोन्याचे, दीड किलो चांदीचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली किशोर मैद (४५, रा. मंगलमूर्तिनगर, कॅनॉल रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. १७) रात्री त्या आपल्या नातेवाइकांच्या घरी जेवणासाठी गेल्या होत्या. रात्री 11.15 च्या सुमारास त्या घरी परतल्या, तेव्हा दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला. घरातील, कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. मुख्य लॉकरमधील सुमारे साडे २१ तोळे सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीची दागिने आणि गणपती उत्सवासाठी ठेवलेले दागिने असा मुद्देमाल जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान आणि फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आले होते. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.