
इंदिरानगर (नाशिक) : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वडाळागाव परिसरातील अनधिकृत कत्तलखान्यावर छापा टाकत १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सौरभ माळी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, वडाळागाव येथील म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे एका पत्र्याच्या घरात गोवंश जनावरांची कत्तल करून त्याची वाहतूक होणार आहे. त्यानुसार पथकाने छापा टाकत कारवाई केली.
नासिर कय्यूम शेख (वय ४०, रा. कसाईवाडा, वडाळानाका), अब्दुल रहिम कुरेशी (वय ३७, रा. वडाळानाका), सईद मजिद कुरेशी (वय ३५, रा. नागसेन नगर, वडाळानाका), हसनैन अफरोज कुरेशी (वय १९, रा. कादरी मस्जिदजवळ, बागवानपुरा), अफरोज बिस्मिल्ला कुरेशी (वय ५१, रा. कादरी मस्जिदजवळ, बागवानपुरा), रहीम अब्दुल्ला कुरेशी (वय ५८, रा. श्रमिकनगर, गंजमाळ), या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. २ इनोव्हा कार, ७ दुचाकी, २०० किलो गोमांस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची अंदाजे एकूण किंमत १५,९०,००० इतकी आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे सहपोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर, संतोष फुंदे, पवन परदेशी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, जयलाल राठोड, सागर परदेशी, दीपक शिंदे, योगेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.