

नाशिक : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरी व 60 हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. अण्णा ऊर्फ सोनू रमेश माळी (रा. वाडीचे रान, पाथर्डी शिवार) असे आरोपीचे नाव आहे.
सोनू माळी याने 12 जून 2020 रोजी परिसरातील अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात सोनूविरोधात पोक्सोसह अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. एस. भामरे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे व ॲड. सुलभा सांगळे यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. व्ही. घुले यांनी आरोपी सोनू माळी यास शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुधाकर गायकवाड, आर. के. पाटील, श्रेणी उपनिरीक्षक आर. एस. शिंदे, अंमलदार मोनिका तेजाळे यांनी कामकाज पाहिले.