

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात इतर कैद्यांनी खुनातील संशयित आरोपीस बेदम मारहाण करीत त्याचा छळ केल्याचा तसेच मनिऑर्डरचे 7 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कैद्याने केलेल्या आरोपानुसार त्याने कारागृह अधीक्षक व डॉक्टरांकडे तक्रार करूनही त्यांनी दखल न घेतल्याने कैद्याने जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात नऊ कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर बाजीराव चौधरी (25, रा. नेर कुसुंबा, जि. धुळे) हा 2021 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक आहे. तो सध्या नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. सागरच्या फिर्यादीनुसार, काही दिवसांपासून शिवीगाळ, मारहाण करीत होते. संशयित कैदी पॉल व त्याचे साथीदार वाघमारे, दिनेश चव्हाण, लाला, मामा (कैदी), वाजिद, महाजन, अमोल आणि मोहन (कैदी) यांनी छळ केल्याचा आरोप सागरने केला आहे. हा गुन्हा मालेगाव छावणी पाेलिसांनी दाखल करून तपासासाठी नाशिक राेड पाेलिसांकडे वर्ग केला आहे. 25 फेब्रुवारी ते 4 मार्च 2025 या कालावधीत ताे तुरुंगात असताना, सर्कल नंबर चारमध्ये असलेल्या कैद्यांमध्ये वाद झाले हाेते. त्यात संशयितांनी सागरवर संशय घेऊन त्याच्या हातपायांना बेडी ठाेकत बेदम मारहाण केली.
त्यानंतर पुन्हा दोन-तीन दिवस सागर हा सर्कलमध्ये असताना त्याची बेडी न काढता संशयितांनी त्याला शिवीगाळ करून धमकी दिली. दरम्यान, कारागृह अधीक्षकांकडे सागरने तक्रार केली, मात्र त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप सागरने केला आहे. दरम्यान, अधीक्षकांकडे तक्रार केली यामुळे संशयितांनी सागरला शाैचालयात जाऊ न देता छळ केला व मारहाण केली. यात डोक्यास दुखापत झाल्यानंतर सागरने डॉक्टरांकडेही तक्रार केली. मात्र, त्यांनीही दखल घेतली नसल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. संशयिताच्या छळाला कंटाळून सागरने आत्महत्येचा प्रयत्न केला. छळाच्या सर्व घटना कारागृहातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद असल्याचे सागरने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस तपास करीत आहेत.