

नाशिक : उपचारात हलगर्जीपणा केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृताचा नातलग असल्याचा दावा करणाऱ्यासह डॉक्टर, सिव्हिल कार्यालयीन अधीक्षकासह चौघांनी १० लाख रुपये खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली तर पाटील यांना चौकशीसाठी बोलावले असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. प्रतीक अशोक भांगरे (३८, रा. कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, मृताचे नातलग असल्याचा दावा करणारा राहुल खुर्चे, जिल्हा रुग्णालयातील माजी डॉ. आनंद विलास पवार, वंचित बहुजन आघाडीचा रवि पगारे, जिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक व्ही. डी. पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. भांगरे यांच्या फिर्यादीनुसार, ते जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयात ३१ जानेवारीला दीपाली झोले या महिलेस उपचारासाठी दाखल केले होते. प्रसूतीनंतर मूत्रपिंड निकामी झाल्याने दीपाली यांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात संदर्भित केले होते. मात्र उपचारादरम्यान, त्यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
ज्ञानेश्वर जाधव या व्यक्तीने माहितीच्या अधिकारात डॉ. भांगरे यांचे शिक्षण विचारले आहे. डाॅ. भांगरे यांचे शिक्षण एमबीबीएस झाले असून, तरीदेखील त्यांच्याकडे अतिदक्षता विभागाचा पदभार देण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा पदभार एमएस शिक्षण घेतलेल्या डॉक्टरकडे असणे अपेक्षित असल्याचा आरोप संशयित करत आहेत. यावरून महात्मानगर मैदानावर वाद झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शिंदे यांनी मारहाण केल्याने खांद्यास गंभीर दुखापत झाल्याचा आरोपही संशयित डॉ. आनंद पवार यांनी केला आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. त्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ फेब्रुवारीला संशयित राहुल खुर्चे व रवि पगारे हे दीपाली यांचे नातलग असल्याचे सांगत रुग्णालयात आले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांना भेटून दीपालीच्या मृत्यूस डॉ. भांगरेसह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप केला. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. दरम्यान, दीपाली झोले यांचे नातलग नसतानाही राहुल खुर्चे याच्यासह इतरांनी ४ फेब्रुवारीपासून संगनमत करून डॉ. भांगरे यांच्यावर दीपालीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करीत १० लाख रुपयांची मागणी केली. संशयितांकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने व जिवे मारण्याची तसेच गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्याची धमकी देत असल्याने डॉ. भांगरे यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सरकारवाडा पोलिसांनी तपास करीत डॉ. पवार आणि खुर्चे यांना अटक केली आहे. यापैकी खुर्चे यास बुधवार(दि. २६)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर डाॅ. पवार यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
डॉ. भांगरे यांच्या फिर्यादीनुसार ते दि. २० फेब्रुवारीला दुपारी 2 च्या सुमारास कारने जात असताना मेहेर सिग्नल येथे दुचाकीस्वाराने धडक देऊन पसार झाला. त्यानंतर रात्री 8 वाजता राहुल खुर्चेने फोन करून, 'दुपारचा जलवा कसा वाटला, पैसे देऊन प्रकरण मिटवून टाक. नाही तर पूर्ण पिक्चर दाखवावा लागेल. २५ तारखेपर्यंत व्ही. डी. पाटीलकडे पैसे जमा कर. सुधारला नाही, तर जिवावर बेतणार' अशी धमकी राहुल खुर्चेने दिली. त्यामुळे २५ तारखेची मुदत दिल्याने भीतीपोटी डॉ. भांगरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.