

नाशिक : पुनर्स्थापनेसाठी अखत्यारीतील कामगाराकडून बक्षिसी म्हणून १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मध्य वैतरणा धरण प्रकल्प (कोचाळे, ता. मोखाडा) वरील दुय्यम अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. जय भवानी रोडवर बुधवारी (दि. ६) ही कारवाई झाली. प्रवीण किसन बांबळे (४६, रा. जय भवानी रोड, नाशिक रोड) असे आरोपीचे नाव आहे.
तक्रारदार हे बृहन्मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या मध्य वैतरणा धरण प्रकल्प (जि. पालघर) येथे कामगार आहेत. त्यांची सरळ सेवेने कार्यकारी सहायक (लिपिक) या पदावर नियुक्ती होऊन त्यांची बदली सहायक आयुक्त, जी, उत्तर विभाग, दादर (मुंबई) येथे दर्शविण्यात आली होती. ती पदस्थापना गैरसोयीची असल्याने त्यांनी वरिष्ठांकडे पुनर्पदावर व अगोदरच्या ठिकाणी बदली होण्याची विनंती केली हाेती. त्यानुसार मध्य वैतरणा धरण प्रकल्प येथे कामगार पदावर त्यांची पुनर्स्थापना झाली होती. ते दि. १८ ऑगस्टला हजरदेखील झाले होते. मात्र, प्रक्रियेत आपण मदत केली असल्याचे भासवून बांबळे यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील पाच हजार स्वीकारले होते. त्यानंतर संबंधिताने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या पथकाने उर्वरित १० हजार रुपये स्वीकारताना बांबळेला रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार (दि.६) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.