

नाशिक : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्या साथीदारासह मिळून महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना काठे गल्ली परिसरात घडली. याप्रकरणी 43 वर्षीय महिलेने भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
काठे गल्ली परिसरातील एका इमारतीत राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिच्यावर सोमवारी (दि.6) सायंकाळी 4:30 वाजता संशयित सोपान सावळीराम नाडे (रा. वडाळा नाका) याच्यासह त्याच्या जोडीदाराने प्राणघातक हल्ला केला. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती सोपानसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कालांतराने महिलेने सोपानसोबत राहण्यास नकार देत त्यास घरातून निघून जाण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने सोपानने त्याचया जोडिदारास महिलेच्या घरी बोलवले. साथीदाराने महिलेस पकडून ठेवले तर सोपानने तिच्यावर धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. त्यानंतर महिलेस पाण्याच्या टबमध्ये नेत तिचे तोंड बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनी महिलेस सोडून पळ काढला. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून भद्रकाली पोलिसांनी तपास करीत संशयित सोपान नाडे यास अटक केली आहे.