

नाशिक : कबुतरबाजीवरून झालेल्या वादात मित्राची हत्या करणारा आणि मागील दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा संशयित नौशाद हाजी सय्यद मुलानी (१९, रा. सिन्नर) याला अखेर गुन्हे शाखा युनिट-२ च्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.
दि. १३ एप्रिल २०२५ रोजी रात्री १० ते ११.३० दरम्यान पांडवलेणीच्या पायथ्याशी राम बोराडे, राजेश बोराडे, शौकत शेख, नफीस खत्री यांच्यासह विजय माळेकर, नफीज सैयद, रोहित पालवे आदी संशयित ज्ञानपीठ सोसायटीसमोर मद्यपार्टी करीत होते. त्यावेळी कबुतरबाजीवरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यावरून संशयित शौकत शेखच्या चिथावणीवरून संशयित विजय माळेकरने राम बोराडेच्या पोटात सुरा भोसकून त्याचा खून केला होता, तर त्याच्या साथीदारांनी परिसरात तलवारी, कोयत्यांनी वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात राम बोराडेचा खून केल्याप्रकरणी सहा संशयितांसह दोन विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला होता. यातील चौघा संशयितांसह अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र संशयित नौशाद अजिज सैय्यद मुलानी हा फरार होता. तो पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-२ मधील सहायक पोलिस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक गुलाब सोनार, हवालदार प्रकाश महाजन, अतुल पाटील, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेत इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नाशिक : संशयित आराेपीसह गुन्हे शाखा युनिट-२ चे अधिकारी व कर्मचारी.