Nandurbar | 14 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
नंदुरबार : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नंदुरबार पथकाने तळोदा-भवर रोडवरील भवर फाटा, तळोदा शिवार येथे जप्त केला. ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागीय उपआयुक्त उषा वर्मा आणि नंदुरबारचे अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत टोयोटा इनोव्हा (वाहन क्रमांक GI-05-CG-3206) या चारचाकी वाहनातून अंदाजे 70 बॉक्स म्हणजेच 604.8 लिटर विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे तर एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे 14 लाख 19 हजार 600 रुपये आहे.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड करत आहेत. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक अ. शा. गायकवाड, डी. बी. कोळपे, आर. राजपूत, संदीप वाघ, सौरव चौधरी, अमित अहिरराव आणि कल्पेश वाणी यांनी संयुक्तरित्या पार पाडली.

