Toxic Relationship Crime | प्रेम, दारू आणि कटकारस्थान: सुरजच्या मृत्यूमागचं भयावह सत्य

Naive Love Story | नादान प्रेमाचा शेवट
Toxic Relationship Crime
नादान प्रेमाचा शेवट (Pudhari File Photo)
Published on
Updated on
Summary

सुरजला दारूचे व्यसन होते. अनेकदा विजय त्याला दारू पाजत असे. त्याला काय माहिती, विजयच्या डोक्यात वेगळीच योजना सुरू होती. त्यासाठी तो हे सर्व काही करत होता. एकेदिवशी संगीता आणि विजय यांनी संधी मिळताच डाव टाकला अन् सुरजला कायमचे आपल्या वाटेतून दूर केले...

पुण्यातील लोणीकाळभोर परिसरात सुरज आणि विजय राहायचे. दोघांची शेतीदेखील मळ्यात शेजारी-शेजारीच. त्यातूनच एकत्र उठबस असायची. विजय नेहमी सुरजच्या घरी यायचा. त्यातूनच सुरजची पत्नी संगीता आणि विजय एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांचं चांगलंच सुत जुळलं. संगीता नेहमी विजयच्या शेतात आणि घरी जायची. सुरज याला याची कुणकुण लागली. त्याने संगीताला विजयच्या संपर्कात न राहण्याबाबत बजावलंसुद्धा होतं. परंतु ती विजयसाठी वेडी झाली होती. कोणाचेच काही ऐकण्यास ती तयार नव्हती. त्यामुळे सुरज आणि संगीता यांच्यात खटके उडू लागले.

Toxic Relationship Crime
सातारा : ‘क्राईम’मधील महिलांचा वाढता टक्‍का चिंतेचा

विजय देखील आता चांगलाच निर्ढावला होता. तो कसलीच भीती न बाळगता संगीताला रात्री-अपरात्री कॉल करू लागला होता. एकदा तर दोघे कुठेतरी निघूनसुद्धा गेले होते. विजय आणि संगीताच्या अनैतिक संबंधाची माहिती सुरज याच्या घरच्यांनासुद्धा कळाली होती. सुरजने सांगितल्यानंतर देखील एके दिवशी संगीता विजयच्या शेतावर त्याला भेटायला गेली. त्यातून पती-पत्नीत मोठा वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, त्यावेळी संगीताने सुरजला तुझा कायमचा काटाच काढते, अशी धमकी दिली. त्यानंतर ती माहेरी निघून गेली.

Toxic Relationship Crime
Mumbai Crime: दादरच्या उच्चभ्रू शाळेतील प्रकरणात ट्विस्ट, शिक्षिकेने दिला Whats App चॅटचा पुरावा, 'विद्यार्थ्यासोबत मी...'

दोघांच्या अनैतिक संबंधात सुरज अडसर ठरत होता. त्या रागातून तो संगीताला नेहमी मारहाण देखील करत असे. त्यामुळे संगीता वैतागली होती. त्यातूनच प्रियकर विजय आणि संगीता या दोघांनी सुरजचा कायमचा बंंदोबस्त करण्याची योजना आखली. सुरुवातीला दोघांना सुरजचा खून करायचा नव्हता. त्याला जायबंदी करून एका जागेवर बसवायचे होते. परंतु, विजय याने सुरजला कायमचेच दोघांच्या वाटेतून दूर केले.

त्या दिवशी सुरज एकटाच घरी होता. त्याने मद्य प्राशन केले होते. विजय सुरजसाठी जेवण घेऊन आला. सुरज घराबाहेर झोपला होता. त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले असतील. विजयच्या डोक्यात सुरजचे काम तमाम करण्याचे विचार सुरू होते. तो संधीची वाटच पाहात होता. त्याच दिवशी त्याला ती संधी मिळाली. सुरज झोपेत असतानाच त्याने डोक्यात फावड्याच्या दांडक्याने वार केले. घाव वर्मी लागल्यामुळे सुरज याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर विजयने तेथून पळ काढला. सकाळी सातच्या सुमारास मळ्यातील शेजार्‍यांनी सुरज याच्या नातेवाईकांना तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती दिली. सुरजचा खून झाल्याची माहिती गावात वार्‍यासारखी परसरली.

लोणीकाळभोर पोलिसांना ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक पूजा माळी, अनिल जाधव, रत्नदीप बिराजदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुरज त्याच्या घरासमोर पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. सुरज याचा खून झाला होता. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. त्यावेळी त्याची पत्नी संगीता आणि गावातील व्यक्ती विजय या दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना आता तपासाचा धागा मिळाला होता. सुरज याचा खून ज्या दिवशी झाला, त्या दिवशी रात्री 9 वाजता आणि मध्यरात्री दोन वाजल्यानंतर संगीता आणि विजय या दोघांचे कॉल झाल्याचे तांत्रिक विश्लेषणात समोर आले. तसेच संगीताला जेव्हा सुरज याचा मृत्यू झाल्याचे कळविले, तेव्हा ती सुरज याच्या मृतदेहाजवळ न जाता महिलांमध्ये जाऊन बसली. त्यावेळी तेथील काही लोकांना संगीताच्या साडीवर रक्ताचे डाग दिसून आले. त्यांनी याबाबत तिला विचारले असता, तिने मच्छर मारल्याचे डाग असल्याचे सांगितले. परंतु ते रक्ताचे डाग माणसाचे असल्याचे तेथील लोकांनी हेरले होते.

Toxic Relationship Crime
Cyber Crime: पुण्यातील कंपनीला सव्वादोन कोटींचा गंडा; इटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल

दुसरीकडे एरवी नेहमी सुरज याच्या घरी येणारा विजय एवढी मोठी घटना घडल्यानंतरसुद्धा फरार झाला होता. विजय याने सुरजला ठार केल्यानंतर संगीताला ही माहिती दिली होती. तसेच ती रात्री घरी येऊन परत माहेरी निघून गेली होती. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या कारणातून सुरज याचा पत्नी संगीता हिने आपला प्रियकर विजय याच्या साथीने खून केला होता. अवघ्या तीन तासांत लोणीकाळभोर पोलिसांनी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा छडा लावला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news