

नरेंद्र राठोड, ठाणे
मुंबईतील नेस्को ड्रग्ज पार्टीचे कनेक्शन कल्याण पर्यंत येऊन पोहोचले आहे. मुंबई पोलिसांनी नेस्को ड्रग्ज पार्टीत ड्रग्ज पुरवठा करणार्या एका महिलेस अटक केली असून, तिच्या आलिशान घरातून 6 कोटी रुपये किमतीच्या 5 हजार एक्स्टसी ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आदी बड्या शहरांत इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणार्या रेव्ह पार्ट्यांमध्ये ही महिला ड्रग्ज विक्री करीत होती, असे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे अलीकडे इव्हेंट व म्युझिक कॉन्सर्टच्या आडून ड्रग्जच्या रेव्ह पार्ट्यांचे कल्चर वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका म्युझिक कॉन्सर्टदरम्यान झालेल्या ड्रग्स पार्टी प्रकरणाने खळबळ उडवून दिली आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता, तर काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मुंबईमधून पाच जणांना, तर कल्याण नजीकच्या टिटवाळा शहरातून एका महिलेस या पार्टीत ड्रग्ज पुरवठा केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अश्विनी फ्रान्सिस पॉल असे टिटवाळा मधून अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून ती पूर्वी डान्स बारमध्ये काम करीत होती, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आले आहे.
मूळची पुण्याची रहिवाशी असलेली अश्विनी फ्रान्सिस पॉल ही नवी मुंबईत राहत होती. तिने आपल्या पहिल्या पतीस सोडले असून, ती सध्या तिच्या बॉयफ्रेंड सोबत कल्याण टिटवाळामधील पद्मावती रॉयल्स, इमारत नंबर दोनमध्ये रूम नंबर 705 मध्ये राहत होती. म्युझिक कॉन्सर्ट व इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणार्या ड्रग्ज रेव्ह पार्टीत ती ड्रग्ज सप्लाय करीत होती, असे देखील पोलिस तपासातून उघड झाल्याने पोलिस आता तिची कसून चौकशी करीत आहेत. ऑनलाईन व व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून अशा पार्ट्यांचे मॅसेज पाठवून अशा पार्ट्यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली जात होती. दरम्यान, या प्रकरणामुळे म्युझिक कॉन्सर्ट व इव्हेंटच्या नावाखाली आयोजित होणार्या ड्रग्ज रेव्ह पार्टीचे काळे कारनामे पुन्हा एकदा समोर आले आहेत.
रेव्ह पार्टी हा मुख्यत: धनदांडग्या लोकांचा रिकामटेकडा पण तितकाच खर्चिक उद्योग म्हटलं तर वावगं होणार नाही. रेव्ह पार्टी म्हणजे दारू, नाच-गाणं, ड्रग्ज आणि सेक्स यांचं कॉकटेल असतं. रेव्ह पार्टी अत्यंत गुप्तपणे एखाद्या निर्जनस्थळी आयोजित करण्यात येते. मुंबई ठाण्यातील सुमारे 150 हून अधिक बड्या हॉटेल्स आणि क्लब अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन अत्यंत गुप्तपणे करतात. त्यासाठी पार्टी आयोजकांनी वेगवेगळे व्हॉटस्अॅप ग्रुप बनवले आहेत. या ग्रुपमध्ये फक्त अशाच लोकांना सामील करून घेतलं जातं, जो आधीच्या ग्रुप मेम्बरच्या ओळखीचा आणि विश्वासू असतो. ग्रुपच्या माध्यमातून मॅसेज टाकून या पार्ट्यांची प्रसिद्धी केली जाते. रेव्ह पार्ट्यात सहभागी होण्यासाठी लागणारी इन्ट्री फी, दारू व ड्रग्जचे प्रकार आणि इतर सुख सुविधांची यादी या ग्रुपवर वेळोवेळी टाकण्यात येते. साहजिकच या यादीत अश्लीलतेचा प्रकारदेखील सामील असतो. अशा रेव्ह पार्ट्या खासकरून ख्रिसमस, थर्टीफस्ट डिसेंबर आणि प्रत्येक विकेंडला आयोजित करण्यात येतात. सध्या मुंबई-ठाण्यात अशा पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याने आयोजक इव्हेंट अथवा म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली अशा पार्ट्या आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये श्रीमंतीचा थाटमाट असणारी लोकं आधी हजेरी लावत असत. पण हल्ली या रेव्ह पार्ट्यात मध्यमवर्गीय घरातील तरुण मुलंदेखील हजेरी लावू लागली आहेत. नवनव्या प्रकारांच्या ड्रग्जच्या प्रचारासाठीदेखील या रेव्ह पार्ट्या कुप्रसिद्ध आहेत. एखाद्या ड्रग्ज माफियाने नवा ड्रग्जचा प्रकार मार्केटमध्ये आणला की, त्याचा नमुना अशा पार्ट्यांमध्ये वाटला जातो. नवा ड्रग्जचा नमुना तरुणांना दिला की त्याची जाहिरात होते व मागणी वाढू लागते.