

मुंबई : आर्थर रोड जेलमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या हाणामारीत कोणीही जखमी झाले नसले, तरी जेलमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हाणामारी प्रकरणी सात जणांविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात प्रसाद ऊर्फ सुभाष विठ्ठल पुजारीसह इरफान रहिम खान, शोएब खान ऊर्फ भुरया, अयुब अनुमुद्दीन शेख, मुकेश सिताराम निशाद, लोकेंद्र उदयसिंग रावत, सिद्धेश संतोष भोसले यांचा समावेश आहे.
मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये विविध टोळ्यांचे गुंड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 7 जुलैला जेलमध्ये दोन गटांत क्षुल्लक कारणावरून अचानक हाणामारी झाली. हा प्रकार जेल प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही गटांना वेळीच बाजूला करण्यात आले. त्यामुळे प्रकरण अधिक चिघळले नाही. हाणामारीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र हाणामारीची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली याचा खुलासा अद्याप होऊ शकलेला नाही.
या घटनेनंतर जेल प्रशासनाकडून ही माहिती ना. म. जोशी मार्ग पोलिसांना देण्यात आली. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी प्रसाद पुजारीसह सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा सध्या पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्रसाद पुजारी हा अंडरवर्ल्ड गँगस्टर असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
गँगस्टर प्रसाद पुजारी गेल्या वीस वर्षांपासून त्याच्या पत्नीसोबत चीनमध्ये राहत होता. त्याच्या अटकेसाठी मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.
चीनमध्ये वास्तव्याची माहिती मिळताच त्याच्या अटकेसाठी इंटरपोलची मदत घेण्यात आली होती. अखेर इंटरपोलच्या मदतीने त्याला मार्च 2024 रोजी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते.
त्यानंतर त्याला खंडणीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड जेलमध्ये आहे.