

मुंबई : सोने तस्करीप्रकरणी दोघांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम अधिकार्यांनी अटक केली. या दोघांकडून पाच कोटी दहा लाख रुपयांचे 5750 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे. नितीन दशरथ इंगले आणि हर्षल अनिल खरात अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर दोघांनाही किल्ला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचारी सोने तस्करीच्या गुन्ह्यांत सक्रिय असल्याची माहिती कस्टम अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर कस्टम अधिकार्यांनी अशा कर्मचार्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. शनिवारी (दि.17) रोजी दोन वेगवेगळ्या कारवाईत नितीन इंगले आणि हर्षल खरात या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते दोघेही विमानतळाबाहेर जाण्याचा प्रयत्नात होते. त्याच वेळेस त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेण्यात आली होती. त्यात या दोघांच्या जॅकेटमध्ये मेणातील सोन्याचे धूळ असलेले सहा पॅकेट सापडले. या कारवाईत या अधिकार्यांनी 5 किलो 750 ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहेत. त्याची किंमत पाच कोटी दहा लाख रुपये आहे. हे दोघेही विमानतळावरील एका कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला आहेत. ते दोघेही कपड्यातून विमानतळाबाहेर सोने आणून देण्यास सोने तस्करांना मदत करत होते.