मोहोळ : पुढारी वृत्तसेवा
मोटारसायकलींची चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीचा मोहोळ पोलिसांनी पर्दाफाश केला. मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर येथील तीन मोटरसायकल चोरांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या. बळीराम मगर चव्हाण, किरण रामचंद्र चव्हाण, विजय बाळासाहेब चव्हाण (सर्व रा. खुणेश्वर ता. मोहोळ) अशी पकडण्यात आलेल्या मोटारसायकल चोरांची नावे आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून मोहोळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना घडत आहेत. त्या संदर्भात मोहोळ पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मोहोळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डी.बी) पथक सोमवार १७ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर गावात चोरुन आणलेल्या मोटारसायकली असल्याची गोपनीय माहिती पोलिस प्रशासनाला मिळाली.
त्यानुसार पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या सुचनेनुसार पोलिस नाईक शरद ढावरे, पो.कॉ. गणेश दळवी, पो.कॉ. प्रविण साठे यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. सदरचे पथक खुणेश्वर गावात दाखल झाले असता, गावातील बळीराम मगर चव्हाण, किरण रामचंद्र चव्हाण, विजय बाळासाहेब चव्हाण यांच्याकडे चोरीच्या तीन मोटारसायकल मिळाल्या. या बाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता तिघेही उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. त्यामुळे पोलिसांनी मोटारसायकलींसह तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोहोळ पोलिस स्टेशन येथे आणले.
यावेळी १५ जुलै २०२० रोजी चोरी झालेल्या गुन्ह्यातील दोन मोटारसायकल आणि वरील तिघांकडे मिळालेल्या मोटारसायकल एकच असल्याचे समजले. त्यांपैकी एक मोटारसायकल अंजली आनंद अबुटे (रा. मोहोळ) तर दुसरी दिपक परमेश्वर धोटे (रा. कातेवाडी ता. मोहोळ) यांच्या असल्याचे निष्पन्न झाले. तर तिसरी मोटारसायकल या चोरट्यांनी तुळजापूरातून चोरल्याचे समजले.
या प्रकरणी पोलिसांनी वरील तिघांच्या टोळीला दाखल गुह्यात अटक करुन जेरबंद केले आहे. या टोळीत यांचे अन्य साथीदार देखील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली असून चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे. मोहोळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे (डी.बी) पथकाने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे वाहन मालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.