Migrant criminal : घरफोड्या करणारा परप्रांतीय गुन्हेगार गजाआड
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : शहरात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या घरफोडीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, याप्रकरणी आंतरराज्यातील गुन्हेगाराला अटक झाली आहे. त्याच्या ताब्यातून चार लाख ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा माग काढला.
अभियंतानगर परिसरातील राजेंद्र बाफना यांच्या बंद घरात ११ फेब्रुवारीला घरफोडी झाली होती. रोकडसह दागिने असा १२ लाखांचा एेवज चोरीला गेला होता. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तपास सुरू होता. दरम्यान, जिल्ह्यातील नाउघड घरफोडीच्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आढावा घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. घटनास्थळी मिळाले भौतिक पुरावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करुन आरोपीचा माग काढण्यात आला. त्यातून ईश्वरसिंग नरबीनसिंग चावला (२४, रा. परमती, जि. बडवानी, मध्य प्रदेश) या सराईत गुन्हेगाराचे नाव निष्पन्न झाले.
न्यायालयाच्या आदेशान्वये जळगाव कारागृहातून वर्ग करुन घेण्यात येऊन त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्यात त्याने इतर दोन साथीदारांसह ही घरफोडी केल्याची कबुली दिली. अधिक तपासात चोरीच्या गुन्ह्यातील ६० ग्रॅम ३८ मिलीग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली. चावलाविरोधात धुळे जिल्ह्यात आणि मध्यप्रदेश राज्यात दरोडा तयारी, चोरी, घरफोडी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

