लग्नाचा बाजार ! विवाहेच्छु तरुणांना गंडविण्याचा उद्योग

लग्नाचा बाजार ! विवाहेच्छु तरुणांना गंडविण्याचा उद्योग
Published on
Updated on

[author title="सुनील कदम" image="http://"][/author]

मुलींच्या आणि तिच्या पालकांच्या वाढत्या अपेक्षा, काही समाजामध्ये असलेली उपवर मुलींची कमतरता, सर्वच समाजात दरहजारी कमी झालेले मुलींचे प्रमाण यामुळे गेल्या काही वर्षांत उपवर तरुणांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्किल झाले आहे. चाळिशी गाठली तरी मुलांची लग्ने ठरेनात, अशी अवस्था झाली आहे. नेमक्या या परिस्थितीचा काही महाभागांनी लाभ उठवायला सुरुवात केली आहे. लुटुपुटूची लग्ने लावून विवाहेच्छु तरुणांना गंडविण्याचा उद्योग सुरू झाला आहे, त्यावर एक प्रकाशझोत…

या कुरुंदवाड येथे दोन तरुणांची खोटी लग्ने लावून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पाचच दिवसांमध्ये नववधूंनी दागिन्यांसह पलायन केले आणि या गोष्टीचा गवगवा सुरू झाल्यानंतर हे लग्न लावून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या दलालांवर गुन्हा दाखल झाला, पण हा काही पहिलाच प्रकार नाही. गेल्या आठ-दहा वर्षात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात असे शेकडो प्रकार चव्हाट्यावर आले आहेत. काही प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत, तर काही प्रकरणांची लोकलज्जेस्तव कुठे वाच्यतासुद्धा झालेली दिसत नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील एका सधन पण अल्पसंख्याक समाजातील शेकडो विवाहोत्सुक तरुणांची कर्नाटकातील त्याच समाजातील काही उपवर मुलींच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत करोडो रुपयांची लूट झाल्याचे धक्कादायक प्रकारही चव्हाट्यावर आला आहे, पण कुणाकडे तक्रार केली तर आपलेच हसे होईल या भीतीने या प्रकरणी अजून तरी कुठे तक्रार दाखल झालेली नाही. काही बाबतीत तर संबंधित तरुणीच्या नातेवाईकांनी आणि दलालांनी फसवणूक झालेले तरुण आणि त्याच्या पालकांनाच धमकावून, खोटे गुन्हे दाखल करायची भीती दाखवून गप्प बसायला भाग पाडले आहे. लाखो रुपये गेले ते गेले, शिवाय बायकोही गेल्यामुळे या तरुणांवर आज लाजिरवारे होण्याची वेळ आलेली दिसत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सधन असलेला एक अल्पसंख्याक समाज आहे. या भागातील जवळपास पंचवीस ते तीस टक्के शेती या समाजातील लोकांच्या मालकीची आहे. त्यामुळे घरातील पुरुषमंडळी आणि तरुणांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून या समाजातील युवकांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण तुलनेने तसे कमीच आहे. काही युवक अलीकडे वेगवेगळ्या व्यापार-उद्योगातही उतरल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे अन्य समाजांच्या तुलनेत या समाजातील दरहजारी मुलांच्या तुलनेत मुलीचे प्रमाण ६५० ते ७०० च्या आसपास आहे. त्यामुळे या अल्पसंख्याक समाजातील हजारो युवकांमध्ये आपल्या समाजातील उपवर मुली मिळवण्याची एक फार मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या समाजातील मुलांपेक्षा मुलींमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण तुलनेने खूपच जास्त आहे, पण अशा उच्चशिक्षित तरुणी लग्नाच्या बाबतीत शेती करणाऱ्या तरुणांपेक्षा नोकरी अथवा स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या तरुणाला प्रथम पसंती देतात. त्यामुळे या समाजातील अल्पशिक्षित आणि प्रामुख्याने शेती करणाऱ्या तरणांपुढे आपल्यासाठी उपवर वधू मिळवण्याचे एक फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

अल्पसंख्याक समाजाप्रमाणेच आजकाल बहुतांश समाजात लग्नासाठी उपवर मुलांना वधू मिळविणे महाजिकिरीचे होऊन बसले आहे. लग्नासाठी अनेक तरुण जातीपातीची बंधनेही तोडून टाकायला तयार आहेत, कोणत्याही समाजाची मुलगी मिळू दे, पण एकदाचे लग्न होऊन जाऊ दे, अशी या तरुणांची मानसिकता बनली आहे; मात्र तरीही अशा तरुणांना लग्नासाठी मुली मिळेना झाल्या आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत जवळपास प्रत्येक समाजात लग्नाचा बाजार तेजीत असलेला दिसत आहे. सीमा भागातील काही दलालांनी तर या लग्नांचाच बाजार मांडलेला दिसत आहे.

महाराष्ट्राच्या मानाने कर्नाटकात जवळपास प्रत्येक समाजात दरहजारी मुलीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे विवाहेच्छुक युवकांना कर्नाटकातील उपवर मुली सहज उपलब्ध होतात, अशी आजची तरी अवस्था आहे. नेमका याचाच फायदा उचलून दोन्ही राज्यातील काही दलालांनी या समाजातील विवाहोत्सुक तरुणांच्या लग्नाचा धंदा मांडून लाखो रुपये उकळून संबंधित तरुणांना गंडा घालायला सुरुवात केली आहे.

ही पद्धत अशी आहे की, महाराष्ट्रातील दलालाने विवाहोत्सुक तरुणाला गाठायचे, कर्नाटकात तुला अनुरूप होतील अशी तुझ्या समाजातील चार-दोन मुली आहेत, तुझी तयारी असेल तर बघ, आपण लगेच स्थळ बघून येऊ, असे म्हणून त्या तरुणाला तयार करायचे. तिथून पुढची जबाबदारी कर्नाटकातील दलालाची. तो दलाल कर्नाटकातील त्या समाजातील अगदी गरिबातल्या गरीब कुटुंबात जिथे कुठे उपवर मुली आहेत, अशा पालकांना गाठतो आणि महाराष्ट्रातील संबंधित स्थळासाठी तयार करतो. यथावकाश विवाहोत्सुक तरुणांकडून स्थळांची पाडणी होते, वधू पसंती होते आणि एकदाचा लग्नाचा मुहूर्त ठरतो आणि इथूनच संबंचित वराच्या नशिबी दुर्दैवाचे दशावतार दाखल होता.

महाराष्ट्रात वरदक्षिणा देण्याची प्रथा असली तरी कर्नाटकात मात्र काही समाजात, काही ठिकाणी मुलीच्या पालकांना वधूदक्षिणा देण्याची पद्धत आहे. त्यामुळे लग्नापूर्वी विवाहोत्सुक तरुणाला वधू कुटुंबाला काही लाख रुपये द्यावे लागतात. त्यानंतर काही लाख रुपये खर्चून थाटामाटात लग्न पार पडते. वधू रिती-रिवाजानुसार पाच दिवस सासरी राहते आणि त्यानंतर माहेरी निघून जाते. त्यानंतर मात्र वधूला सासरी आणायला गेलेल्या लोकांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ येते.

'तुमच्या घरची चालरीत चांगली नाही, पहिल्या दिवसापासून तुम्ही आमच्या मुलीला त्रास दिला, नवचा मुलाचं चाल-चलन काही ठीक नाही, सासरा अथवा दिराची नजर चांगली नाही', यासारखी खरी-खोटी सतराशे साठ कारणं सांगून मुलीला सासरी नांदायला पाठवायला मुलीचे पालक नकार देतात. वधूदक्षिणेची रक्कम परत मागितली तर सगळ्या घरादाराविरुद्ध कौटुंबिक छळाची फिर्याद देण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नव्या नवरीला आणायला गेलेले पालक गपगुमान हात हलवीत परत येतात.

काही बाबतीत तर लग्नानंतर चार-दोन दिवसांत संबंधित नववधूच दागदागिन्यांसह पोचारा करताना दिसतात. लग्नात अशा पद्धतीने फसवणूक झाल्याच्या शेकडो तक्रारी गेल्या काही वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या आहे. एका एका तरुणीने एका पाठोपाठ अनेक तरुणांशी लग्ने करून त्यांची फसवणूक केल्याच्याही घटना पुढे आलेल्या आहेत. एकूणच लग्नाच्या बाजारात दिवसेंदिवस फोफावत निघालेले हे फार मोठे रॅकेट आहे. त्यामुळे विवाहेच्छुक तरुणांनी या रॅकेटपासून सावध राहण्याची गरज आहे.

रौप्यमहात्सवी वधू !

काही वर्षांपूर्वी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पुढे असेच एक प्रकरण आले होते. संबंधित तरुणीने काही दिवसांपुर्वी एका तरुणाशी लुटु‌पुट्टचे लग्न करून त्याची फसवणूक केली होती. काही दिवसांनंतर त्याच तरुणीने दुसऱ्या एका तरुणाशी पुन्हा लग्नाचा घाट घातला होता, पहिला तरुण या दुसऱ्या तरुणाच्या लग्नात गेल्यानंतर आपलीच पूर्वीची बायको आता दुसऱ्याशी संसार थाटत असल्याचे त्याला दिसले. त्याने ही बाब लग्नापूर्वीच दुसऱ्या तरुणाला सांगितल्यानंतर हे सगळे वऱ्हाड पोलिस ठाण्यात आणले गेले. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता त्या तरुणीने अशा पद्धतीने पूर्वी चोवीसजगांशी लग्न केले असून आता ती पंचवीसाव्या वेळी बोहल्यावर चढल्याचे समजले. अशा कितीतरी तरुणी आज लग्नाच्या बाजारात उतरलेल्या दिसत आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news