मालेगाव (नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाट्यानजीक शिमला ईन हॉटेलजवळ शनिवारी (दि. 24) रात्री व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी तालुका पोलिसांनी केवळ काही तासांत दोघा संशयितांना अटक केली. अटकेतील एक सराईत गुन्हेगार असून, दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे
खालिद खान अब्दुल रहमान (रा. हाजी शफी पार्क, दरेगाव) या व्यापाऱ्याला शाहीन अहमद अय्याज अहमद ऊर्फ शाहीन चोरवा (रा. बेलबाग) याचा फोन आला होता. शाहीनने त्यांना चाळीसगाव फाट्याजवळील शिमला ईन हॉटेलजवळ बोलावले. खालिद खान हे आपल्या मित्र शाहरुखसोबत तेथे पोहोचले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्यानंतर शाहीन चोरवा व उमर फारूक सलीम अहमद (दोघेही रा. मालेगाव) हे सिल्व्हर रंगाच्या दुचाकीवर तेथे आले.
बोलणी सुरू असतानाच शाहीनने "तू रेहमानला का बोलवलं?" अशी कुरापत काढून खालिद खान यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळी त्यांच्या मांडीला चाटून गेल्याने त्यांना किरकोळ जखम झाली. दुसरी गोळी चुकली आणि खालिद खान थोडक्यात बचावले. त्यानंतर दोघे आरोपी दुचाकीवरून फरार झाले.
खालिद खान यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक तुषार भदाणे, जमादार रमेश पवार, हवालदार प्रकाश बनकर, तुषार अहिरे, सचिन भामरे, अमोल शिंदे आदींच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत शाहीन चोरवा व उमर फारूक यांना मालेगाव शहरातून अटक केली. न्यायालयाने दोघांना गुरुवार (दि.29) रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
खालिद खान यांनी चौकशीत ‘रेहमानला का बोलवलं?’ या कारणावरून शाहीनने गोळीबार केल्याचे सांगितले असले तरी, चौघांमध्ये सायंकाळपर्यंत चर्चा झाल्यानंतरच गोळीबार झाल्याने हल्ल्यामागे इतरही कारणे अथवा आर्थिक व्यवहार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस सखोल तपास करत आहेत.