

मालेगाव (नाशिक) : येथील श्रीरामनगर स्मशानभूमीमध्ये अघोरी कृत्य झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 17) समोर आला. अंत्यविधी झालेल्या महिलेच्या चितेच्या राखेवर दुधी भोपळासदृश फळ ठेवून त्यावर पाच, सहा ठिकाणी नागाच्या फणीच्या आकाराचे खिळे टोचून अघोरी प्रकार करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे शहरात एकच खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमेश्वरच्या कलेक्टर पट्टा भागातील जमुना बापू पाटील (75) यांचे शनिवारी (दि. 15) निधन झाले. त्याच दिवशी त्यांच्या पार्थिवावर श्रीरामनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेप्रमाणे तिसर्या दिवशी सोमवारी (दि. 17) सकाळी राख सावडण्याचा कार्यक्रम होता. यासाठी सर्व नातेवाईक स्मशानभूमीत आले असता, हा अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
अघोरी विद्येच्या प्रकाराची वाच्यता होताच खळबळ उडून भीतीचे वातावरण पसरले. संबंधित नातेवाइकांनी कॅम्प पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी स्मशानभूमी परिसरात अशाच प्रकारच्या वस्तू आढळून आल्याने यापूर्वीही अघोरी कृत्याचा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अघोरी विद्येच्या साहाय्याने गुप्तधन शोधणे, नरबळी देणे, पैशाचा पाऊस पाडणे, अघोरी उपाय करून रुग्णांवर उपचार करणे किंवा भानामती करणे असे अंधश्रद्धेचे प्रकार आपण नेहमी ऐकतो, वाचतो. त्याच्यातीलच हा प्रकार असल्याची चर्चा परिसरात आहे.
स्मशानभूमीत झालेला प्रकार अघारी विद्येचा आहे. असे कृत्य करणार्यांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
भूषण पवार, नातू, मालेगाव, नाशिक