

मालेगाव (नाशिक) : शहरातील गुलशेरनगर मैला डेपो भागात पूर्ववैमनस्यातून अनिस शेख रशीद इर्फ अनिस मटकी याच्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबार प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघा सराईत गुंडांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टाही हस्तगत केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांनी गुरुवारी (दि. ३१) येथील सुसंवाद हाॅलमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
अधीक्षक पाटील म्हणाले, संशयितांच्या मागावर पथके होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना संशयित म्हाळदे शिवारात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रब्बानी शेख कादिर ऊर्फ रब्बानी दादा (३४, रा. गुलशने इब्राहिम), नईम अख्तर अब्दुल करीम ऊर्फ नईम टिक्का (३८, रा. आयेशानगर) , वामिस शेख युनूस (२२, रा. अक्सा कॉलनी) व शब्बीर शेख फारूक ऊर्फ बीरे (२४, रा. दातारनगर) या सराईत गुंडांना अटक केली. त्यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली. रब्बानी दादा हा हल्ल्याचा सूत्रधार होता. वासिमच्या अंगझडतीत गावठी कट्टा मिळून आला. रब्बानी दादा हा सराईत गुंड असून, त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यात सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गोळीबारात दोन गोळ्या लागल्याने अनिस गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात जखमी अनिसचा भाऊ जाकीर अब्दुल रशीद याच्या तक्रारीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.