Online Fraud | ऑनलाईन फसवणुकीचा मॅजिक जॅक

कोरोना काळानंतर वाढलेले सायबर क्राईमचे गुन्हे चिंताग्रस्त करणारे आहेत.
Online Fraud
Online FraudFile Photo
Published on
Updated on

नरेंद्र राठोड, ठाणे

कोरोना काळानंतर वाढलेले सायबर क्राईमचे गुन्हे चिंताग्रस्त करणारे आहेत. सायबर चोरटे फसवणुकीच्या नवनवीन कल्पना अंमलात आणून अनेक सर्वसामान्यांची फसवणूक करतात. दोन दिवसांत तुमचा पीएफ मिळवा, बिनव्याजी कर्ज, आयकर व इतर टॅक्सचा रिफंड, शासकीय विभागात मेगा भरती, लोनच्या हप्त्यांना स्थगिती, घर बसल्या पैसे मिळवा, डेबिट कार्ड व बँक खाते पडताळणीचे फेक कॉल, ऑनलाईन जॉब, पोर्नोग्राफी साईटच्या माध्यमातून व डीपफेक व्हिडीओच्या माध्यमातून होणारी ब्लॅकमेलिंग अशा एक ना अनेक फसवणुकीच्या क्लुप्त्या या सायबर गुन्हेगारांनी सध्या शोधून काढल्या आहेत.

त्यात आता भर पडली आहे ती मॅजिक जॅक फसवणुकीची. मॅजिक जॅक एक पेन ड्राईव्हसारखा दिसणारा डिव्हाईस आहे. ज्याद्वारे सायबर गुन्हेगार देशविदेशातील नागरिकांकडून ऑनलाईन खंडणी उकळतात.

आसपासच्या शहरात बसून सायबर चोरटे विदेशी नागरिक, बडे सेलिब्रिटी, उद्योजक यांना फोन करतात आणि आम्ही इंटरपोलमधून बोलत आहोत, तुमच्यावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल झालाय, तुम्हाला दंड भरावा लागेल, अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई होईल, अशी बतावणी करीत अनेकांची फसवणूक करतात, पण, ही फसवणूक होतेच कशी? नागरिकांना सायबर चोरट्यांचा संशय येत नाही का?, हे प्रश्न साहजिकच उपस्थित होतात. तर हे शक्य होते ते म्हणजे मॅजिक जॅक या डिव्हाईसमुळे.

मॅजिक जॅक एक असे डिव्हाईस आहे, ज्याच्या साहाय्याने सायवर चोरटे बड्याबड्या लोकांना सहज फसवतात. मॅजिक जॅक डिव्हाईसचा उपयोग करून सायबर चोरटे आपल्या नागरिकांना फोन करतात, त्यावेळी त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर इंटरपोल, सायबर डिपार्टमेंट, लीगल डिपार्टमेंट असे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसते. इतकेच नव्हे तर हा फोन विदेशातून अथवा बड्या शहरातून केला आहे, असे दिसावे म्हणून चोरटे वेगवेगळ्या देशांचे व शहरांचे कोड नंबर या मॅजिक जॅकमध्ये सेट करतात.

त्यामुळे हा फोन आसपासच्या परिसरातून केलेला असला तरी ज्या व्यक्तीस कॉल केला जातो त्या व्यक्तीच्या मोबाईल स्क्रीनवर बड्या शहराचा अथवा विदेशाचा कोड नंबर दिसतो. मॅजिक जॅक हे एक असे डिव्हाईस आहे, जे अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, जपान, चीन आदी देशांमध्ये बनवले जाते.

पेन ड्राईव्हसारख्या दिसणाऱ्या या मॅजिक जॅक डिव्हाईसचा उपयोग व्हीओआयपी आणि इंटरनेट कॉल करण्यासाठी केला जातो. मॅजिक जंक डिव्हाईस फोन आणि कॉम्प्युटर यांच्याशी सहज जोड़ता येते. एकदा का हे डिव्हाईस कॉम्प्युटर आणि फोनद्वारे जोडले की जगाच्या कुठल्याही भागातून कुठल्याही देशात त्याच देशाच्या लोकल पिन कोडने इंटरनेट कॉल करता येतो.

हे डिव्हाईस तुम्ही ज्या देशात बसून कॉल करत आहात त्या देशाचा पिन कोड व फोन क्रमांक आपल्यापर्यंतच गुप्त ठेवून तुम्ही कॉम्प्युटरद्वारे ज्या देशाचा ऑप्शन सिलेक्ट केला असेल त्याच देशाचा लोकल पिन कोड कॉल स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल स्क्रीनवर फ्लैश करतो. त्यामुळे हा कॉल कुठल्याही इतर देशांतून केला गेला असला तरी तो कॉल आपल्याच देशातून आला असल्याचे कॉल स्वीकारणाऱ्या व्यक्तीला मीरा रोड येथे काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी छापा टाकून बोगस कॉल सेंटरचा भांडाफोड केल्यानंतर या कॉल सेंटरमधून सुमारे साडेसहा हजार अमेरिकन नागरिकांना टॅक्स डिफॉल्टरच्या नावाखाली धमकी देऊन सुमारे ५०० कोटींना गंडवण्यात आल्याचे समोर आले होते.

या बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन कॉल केल्यानंतर त्या अमेरिकन नागरिकांना आम्ही अमेरिकन रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे कॉल करणारे भामटे सांगत असत. मात्र, भारतातून कॉल आल्यानंतर देखील अमेरिकन नागरिकांना हा फोन कॉल कुठल्यातरी इतर देशातून आल्याचे त्यांच्या लक्षात का येत नव्हते?,

भारतातून कॉल केल्यानंतर देखील अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल स्क्रीनवर त्याच देशाचा लोकल क्रमांक कसा दाखवत होता? या प्रश्नामुळे पोलिसदेखील चक्रावले होते. या बोगस कॉल सेंटरमधून सुरू असलेल्या फसवणुकीच्या घटनेतील टेक्निकल बाबी पोलिसांनी तज्ज्ञांच्या मदतीने उलगडल्यानंतर समोर आला. तो मॅजिक जॅक या डिव्हाईसचा चमत्कार, मॅजिक जॅक हे डिव्हाईस भारतात मिळत नाही.

परंतु, फसवणुकीचा बाजार मांडून बसलेली मंडळी हे डिव्हाईस विदेशातून खरेदी करून भारतात आणतात. मॅजिक जॅक या डिव्हाईसद्वारे कॉल करण्याची काही मर्यादित क्षमता असते. एका मॅजिक जॅक डिव्हाईसद्वारे ३० ते ४० कॉल केल्यानंतर ते डिव्हाईस काम करणे बंद करते. त्यानंतर दुसरे डिव्हाईस कॉम्प्युटरला जोडून नव्याने कॉल करण्यात येतात. मीरा रोड येथील बोगस कॉल सेंटरमधून ठाणे गुन्हे शाखेने तब्बल २०० हून अधिक एक्सपायर न झालेले मॅजिक जॅक डिव्हाईस जप्त केले होते.

मॅजिक जॅक या डिव्हाईसमुळे सायबर गुन्हेगार आसपासच्या शहरात बसून दररोज लाखो विदेशी नागरिकांची फसवणूक करतात. तर आता हे गुन्हेगार बडे उद्योजक, सेलिब्रिटी, शासकीय अधिकारी यांना हनीट्रॅप सारख्या जाळ्यात अडकवण्यासाठी मॅजिक जॅकचा उपयोग करतात, मॅजिक जॅकमध्ये ऑप्शन सिलेक्ट करून त्यात एखाद्या विभागाचे नाव लिहिले की फोन कॉल स्वीकारणाऱ्या व्यक्तीला त्या विभागातून फोन आल्याचे दिसते.

जसे की इंटरपोल, क्राईम ब्रांच, लीगल डिपार्टमेंट अशी ही नावे असतात. तुमच्या नावाने विदेशातून एक पार्सल आले असून त्यात ड्रग्ज आहे, अथवा बेकायदेशीर वस्तू आहेत असे भासवून, तुमच्यावर केस करण्यात येत आहे, अशी धमकी हे सायबर चोरटे देतात. लोन, इमिग्रेशन, ऑनलाईन लॉटरी, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, हनीट्रैप अशा अनेक फसवणुकीच्या प्रकारात मॅजिक जॅकचा वापर केला जातो.

विशेष म्हणजे हा सर्व फसवणुकीचा बाजार शेकडो कोटींच्या घरात रोज होत असतानादेखील तक्रार करण्यास फक्त काहीच लोक पुढे येतात. हा सर्व किचकट आणि अत्याधुनिक फसवणुकीचा प्रकार असल्याने पोलिसदेखील या तक्रारी सहजतेने सोडवू शकत नाहीत. त्यामुळेच हा फसवणुकीचा बाजार आज मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.

कसे काम करते मॅजिक जॅक ?

मॅजिक जॅक हे एक पेन ड्राईव्हसारखे दिसणारे यूएसबी डिव्हाईस असते. या डिव्हाईसचे एक टोक लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरशी जोडले जाते, तर दुसरे मोबाईल फोनला जोडण्यात येते. मोबाईल व लॅपटॉपला हे डिव्हाईस जोडले की, लॅपटॉपमधून आपल्याला १४५ देशांपैकी कोणत्याही देशाचा ऑप्शन सिलेक्ट करता येतो.

एकदा का ऑप्शन सिलेक्ट केला की, आपण जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून त्याच देशाचा लोकल कोडसह कॉल करू शकतो. जसे की आपल्याला भारतात बसून अमेरिकेत कॉल करायचे असेल, तर लॅपटॉपमधून अमेरिका देशाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर आपण भारतात बसून येथीलच सिमकार्डद्वारे कॉल केला तरी अमेरिकेतल्या नागरिकास तो लोकल कोड दाखवेल. त्यामुळे हा कॉल अमेरिकेतूनच आल्याचे वाटते.

महिलांची फसवणूक मॅजिक

जॅक डिव्हाईसद्वारे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांची तर फसवणूक केलीच जातेय; परंतु आता हे लोण ठाण्या मुंबईच्या दारावर येऊन धडकलेय. काही भामटे विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटवर फेक अकाऊंट बनवून विवाह इच्छुक तरुणींना व महिलांना आपण अनिवासी भारतीय असल्याचे भासवून त्यांच्याशी विवाह करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवतात.

आपण हजारो डॉलर महिन्याला कमावतो, असे भासवून ही मंडळी मॅजिक जॅक डिव्हाईसच्या माध्यमातून महिलांना फोन करतात. हा फोन कॉल विदेशातून आल्याचे विवाह इच्छुक महिलांना आपल्या मोबाईल स्क्रीनवर दिसावे म्हणून भामटे मॅजिक जॅकचा वापर करतात. त्यामुळे अशा कॉलकडे आणि फेक लोकांच्या जाळ्यात विवाह इच्छुक महिला सहज अडकतात. त्यानंतर हीच मंडळी विविध कारणे देऊन अशा महिलांची आर्थिक फसवणूक करतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news