

जळगाव : मुक्ताईनगर शहरात रविवारी (दि.16 ) संध्याकाळी एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली. हॉटेल वृंदावनसमोरील प्लॉटिंग परिसरात मोकळ्या जागेत तरुणाचा मृतदेह आढळला. या तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून ही घटना प्रेमसंबंधातून घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मृत तरुणाची ओळख विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) अशी झाली आहे. तो दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी (दि.16 ) सायंकाळी नागरिकांना मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला.
मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळाची पाहणी केली असता हा स्पष्टपणे खून असल्याचे समोर आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणामागे प्रेमसंबंधातून उद्भवलेला वाद असण्याची शक्यता आहे. विष्णू गोसावी कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता आणि बेपत्ता झाल्यानंतर त्याची हालचाल काय होती, याची तपासणी सुरू आहे.
या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून या गूढ खुनाचा उलगडा लवकर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.