

सिडको (नाशिक) : शासकीय नोकरीच्या आमिषाने सुमारे सव्वा कोटी रुपयांना फसवलेल्या एक तरुणाच्या वडिलांनी सिडकोत मामेभावाच्या घरी जीवनयात्रा संपवली.
नोकरीचे आमिष दाखविणारा संशयित शासकीय कर्मचारी सचिन बबनराव चिखले याच्यावर अंबड पोलिसांनी जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फरार चिखले याला पकडण्यासाठी जळगाव व धुळे जिल्हयात पथके रवाना केले आहे. प्रवीण बापू सोनवणे (वय ४९, रा. कंधाणे, ता.सटाणा) असे जीवनयात्रा संपवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण बापू सोनवणे ( वय ४९, सटाणा) यांना सचिन चिखले (रा. नाशिकरोड) यांनी मुलास आणि इतर नातेवाइकांच्या मुलांना नगरपालिका व आयुक्तालय कार्यालयात नोकरीचे आमिष दाखविले. त्यापोटी चिखले यांना त्यांनी वेळोवेळी सव्वा कोटी रुपयेही दिले. मात्र मुलांना नोकरीस लावून दिलेले नाही. चिखले याच्याकडे पैसे मागितले असता त्याने परतही दिले नाही. सोनवणे यांनी ज्या लोकांकडून उसने पैसे घेतले होते, ते लोक पैशांसाठी तगादा लावत असल्याने ते तणावात होते. ते शुक्रवारी (दि. ११ जुलै ) रोजी सिडकोतील राजरत्ननगर येथे रहात असलेले मामेभाचा अनिकेत पवार यांच्या घरी मुक्कामी आले होते. शुक्रवारी रात्री सोनवणे यांनी अनिकेतसमवेत जेवण केले. रात्री अनिकेत पुढील रूममध्ये झोपला होता. शनिवारी (दि. १२ जुलै ) सकाळी ७.३० वाजता मोबाइल चार्जर घेण्यासाठी सोनवणे झोपलेल्या रूममध्ये गेले असता मेहुणे प्रवीण सोनवणे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी समाधान आहिरे (रा. निवाणे, कळवण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलिसांनी संशयित सचिन चिखलेवर जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता उंडे पुढील तपास करीत आहेत.
'मी किती पैसे दिले आहेत ते डायरीत लिहून व्हॉट्सॲपही केले आहे. हे पैसे मिळाल्याशिवाय माझा अंत्यविधी करू नये..' अशी चिठ्ठी लिहून ठेवत सोनवणे यांनी जीवनयात्रा संपवली. शनिवारी अंबड पोलिस ठाणे येथे सचिन बबनराव चिखले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मयत सोनवणे यांच्यावर गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात आले .
मयत सोनवणे यांच्या खिशातून पोलिसांनी चिठ्ठी जप्त केली आहे. तसेच ज्या पेनने लिहिले आहे तो पेन जप्त केला आहे. तसेच तुळशीराम पवार यांच्या नावाने रुपये चार व आठ लाख रुपयांचे बॅंकेतून परत आलेले दोन चेकही जप्त केले आहे.