सखानानाच्या दारात खंडोबाचा जागर होता. खंडोबा देवस्थान जागृत कुलदैवत. तीन वर्षातून एकदा दारात खंडोबाचा जागर घालायची नानाच्या कुटुंबात पद्धत होती. जेवण-खाणं आटोपलं. त्यानंतर नानाच्या दारात लोखंडी लंगर बांधला गेला. सखानानानं लंगरचं पूजन केलं आणि वाघ्यानं 'यळकोट-यळकोट जय मल्हार' चा जयघोष केला. मग मुरळीनं ठेका धरला. हातात दुमडी केलेला रुमाल, एक हात कमरेवर घेऊन मुरळ्या नाचू लागल्या. 'गड जेजुरी राजा माझा मल्हारी ' म्हणत भंडार्याची उधळण सुरू झाली अन् वाघ्या-मुरळीचं गाणं जोर धरू लागलं.
रात्र चढत होती तसं गाणं रंगात येत होतं. वाढणार्या थंडीत गाणं ऐकणार्यांनी चादरी अंगाभोवती गुंडाळल्या. डोक्याला कानटोपी घालून माणसं बसली होती. मध्यरात्री काही मंडळी पांगली. देव खंडोबाला पूज्य मानणारी माणसं नानाच्या अंगणात बसून राहिली होती. पहाटेचे पाच वाजले नि वाघ्याच्या अंगात देव संचार झाला. बांधलेला लोखंडी लंगर वाघ्याच्या हातात दिला. पूर्ण साखळीचा लंगर हातात धरून वाघ्या घुमू लागला. बसलेली मंडळी 'यळकोट-यळकोट जय मल्हार' म्हणून देवाची आळवणी करू लागली अन् एका क्षणात खंडोबाचं नाव घेऊन वाघ्यानं लंगर तोडला. तसा सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सखानाना, त्याचा मुलगा-सून यांनी वाघ्याचं पाय धरलं.
आता चांगलंच उजाडलं होतं. जागर संपला. चहापाणी करून आपला विडा घेऊन लंगर घालणारे गावी निघून गेले. जागर असल्यानं नानाला शेताकडे जाता आलं नव्हतं. दोन दिवसानं नाना शेताकडे चालला होता. मधल्या पाणंदीनं शेताकडे जाताना नानाला जागोजागी रस्त्यावर भंडारा दिसू लागला. तसा नाना पुढं पुढं सरकला. पुढं जाईल तस तसे रक्ताचे काळे डाग अन् भंडारा नानाला दिसू लागला. नानाला समजेना 'हे काय?' नाना थोडा घाबरला. दचकत दचकत तो पुढे गेला.
नाना आता डोंगराच्या कडेला आला. डोंगर वलांडला की दुसरं गाव. नाना डोंगराची डगर चढून वर आला. डगरीपासून थोडं अंतर तो गेला अन् दचकला. डगरीच्या बाजूला कुणा एका महिलेचं प्रेत पडलं होतं. नानानं पुढं होऊन बघितलं तसा वासाचा भपकारा आला. तोंड-नाक दाबतच तो पुढं गेला. सदरची महिला गावातील नाही, हे नानानं ओळखलं. मग या डोंगरात ही आली कशी अन् 'या भंडार्याचा हिथं काय संबंध?' असा नानाला प्रश्न पडला. नानानं गडबडीनं आपलं घर गाठलं. पोलिसांना घटनेची माहिती दिली. खबर मिळताच फौजदार सयाजी पाटील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पोलिसांनी बारकाईने पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करताना मयत महिलेच्या हातातील आवळलेल्या मुठीत लोखंडी साखळीच्या दोन कड्या सापडल्या तसा नाना दचकला. 'साहेब, आमच्या घरात खंडोबाचा जागर हुता दोन दिसापूर्वी. त्या लंगराच्या साखळी कड्या दिसताहेत या. पण हिच्या हातात त्या कशा?' नानाच्या उद्गारानं फौजदार पाटलांच्या डोक्यात काहीतरी चमकलं. मात्र मयत महिलेला नानानं कधीच पाहिलं नव्हतं.
सयाजी पाटलांनी जागर घालणार्या वाघ्यांचा पत्ता घेतला अन् गाडी थेट मंगसुळीत पोहचली. पोलिसांना पाहताच एक वाघ्या घाबरला. 'काय झालं साहेब' म्हणून हात जोडत पोलिसांच्या समोर आला. पोलिसांनी मयत महिलेचे फोटो वाघ्याला दाखविले. मात्र 'आपण हिला ओळखत नाही' असे त्याने सांगितले. पण 'सापडलेल्या लंगराच्या कड्या माझ्याच आहेत' हे त्यानं मान्य केलं. पोलिसांना प्रश्न पडला, 'लंगर ओळखतो मग बाईला का ओळखत नाही?' त्यावर 'आपला लंगरच दोन दिवस सापडत नव्हता. उद्याच्या जागरणासाठी आजच बाजारातनं नवीन आणणार हुतो.' असे तो म्हणाला. त्याला बरोबर घेऊन पोलिस स्टेशनला आले.चार तास पाहुणचार दिला. मात्र 'आपण या महिलेस ओळखतच नाही ' हेच त्याने सांगितले. नानाच्या दारात जागराला असणार्या गावातील सगळ्यांना पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. मात्र 'जागरणादिवशी ही बाई एका कोपर्यात बसून गाणं ऐकत होती. मात्र 'नानाची पाव्हणी असंल' म्हणून आम्ही फारसं लक्ष तिच्याकडं दिलं नसल्याचं' ग्रामस्थांनी सांगितलं. त्यामुळं नानाच्या जागरात ती महिला आली होती, हे निश्चित. मात्र तिचा खून दुसर्या दिवशी झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. शिवाय मृत्युपूर्वी तिच्याशी शारीरिक संबंधही करण्यात आल्याचे अहवालात नमूद होते. खंडोबाच्या जागर मंडळात वेगवेगळ्या गावांची माणसं एकत्र आलेली असतात. त्या अनुषंगानं दोन तीन ताफ्यांच्या प्रमुखांना पोलिसांनी गाठलं. एका ताफ्यातील वाघ्यानं 'ही आमच्या ताफ्यात काम करते, हिचं नाव जमुना असून ती मुरळी हाय. ज्यादिवशी नानाच्या घरी खंडोबाचा जागर झाला त्या रात्री ती मोहनबरोबर तिथं गेली हुती. त्यानंतर ती पुन्हा दिसलीच न्हायी.' पोलिसांनी लागलीच निपाणी गाठली. तिथं मोहनला ताब्यात घेतलं. चांगला झोडपला. मात्र 'आपण जमुनाचा खून केलेला न्हायी. त्या रात्री जागरणानंतर ती घरी गेली ती मला दिसलीच न्हायी.' मग पोलिसांनी त्याला तुटलेला लंगर दाखविला. 'साहेब, त्यादिवशी लंगर सोमनाथकडं मी दिला हुता.' मग फौजदार पाटलांनी सोमनाथला ताब्यात घेऊन चांगलाच पाहुणार दिला. सहा तास पाहुणचार खाऊन मग त्यानं तोडं उघडलं, 'व्हय साहेब, मीच मारलं जमुनाला.
साहेब, साली आमच्या भागातली आणि फिदा झाली त्या मोहनवर. मुरळी म्हणजे सगळ्यांची अन् मला शानपणा शिकवायला लागली. आवळलं नरडं लंगरनं.मी तिच्यावर फिदा झालो हुतो. मुरळीचं जीवनच असं असतंय. मात्र ती मोहनवर प्रेम करत हुती. त्या सखानानाच्या घरचा जागर झाल्यावर ती माझ्याबरोबर निघाली. वाघ्यानं लंगर माझ्याकडंच दिला हुता मात्र मी परत देण्यास विसरलो. वाटंतनं जाताना मी तिला हॉटेलात जेवू घातलं. आम्ही दोघं आमच्या खोलीवर आलो. जरा विश्रांती घेऊन घराकडं जातो म्हणाली. माझ्या खोलीत ती झोपली. रात्री जागरणामुळे तिला झोप लागली. मात्र माझ्या मनात शारीरिक भावना तयार झाली. मी तिच्यावर खोलीतच बलात्कार केला मात्र ती नंतर जागी झाली अन् तिनं माझ्या कानशिलात लावली. मला राग आला. दीडदमडीची मुरळी अन् मला मारतीया? पिशवीतला लंगर काढला अन् त्याचा फास तिच्या गळ्याला लावला. तिनं लंगर तोडण्याचा प्रयत्न केला पण शेवटी गपगार झाली.' सोमनाथ सध्या तुरुंगाची हवा खात पडला आहे.