

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवून कोल्हापूरच्या तरुणाची मोठी फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात तरुणाच्या सासऱ्याने आत्महत्या केली असून, जळगाव येथील पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील भूपी घरगाव येथील आशिष सदाशिव गंगाधर (वय 30) या सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे जळगाव येथील गायत्री भैय्या पाटील हिच्याशी 3 फेब्रुवारी रोजी लग्न लावण्यात आले.
लग्नाआधी गायत्रीच्या नातेवाईकांनी वधू दाखवून २ लाख रुपये आणि ४ तोळे सोन्याचे दागिने देण्याची मागणी केली. यानुसार आशिष याने १ लाख ९५ हजार रुपये आणि सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर गायत्री काही काळ कोल्हापुरात राहिली, मात्र नंतर ती ४ तोळे दागिने घेऊन जळगावला निघून गेली. त्यानंतर तिने सासरी जाण्यास नकार दिला आणि २४ जूनपासून तिचा फोन बंद आला.
या प्रकरणात आशिष गंगाधर व त्याचा चुलत भाऊ गायत्रीचा शोध घेत जळगावला पोहोचले असता, त्यांना समजले की, गायत्रीच्या आईवडिलांविषयी खोटी माहिती देण्यात आली होती. तिच्या वडिलांनी जीवनयात्रा संपवली असून, त्यामागे मुलगी नांदायला न गेल्याचा मानसिक त्रास हे कारण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
याप्रकरणी गायत्री भैय्या पाटील, मिनाक्षी दिनेश जैन, सुजाता ठाकुर, अक्षय ठाकुर आणि धनश्री यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा (गु.र.नं. 239/2025, BNS कलम 318(4), 3(5)) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.