Cold-Blooded Murder | कोल्ड ब्लडेड मर्डर...

Cold-Blooded Murder
Cold-Blooded Murder | कोल्ड ब्लडेड मर्डर...
Published on
Updated on

अशोक मोराळे, पुणे

केतनच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तिचे वर्तन काहीतरी वेगळेच असल्याचे केतनच्या बहिणीच्या लक्षात आले. तिने अचूक हेरले होते. सिया आता तिच्या नजरेत होती. तिने तिच्यावर लक्ष ठेवले. पूर्वीच्या तिच्या वर्तनुकीच्या बाबी वडिलांना सांगितल्या. त्यांनी थेट लोहगड गाठून केतन पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या लक्षात आले, इथं केतनचा घात झालाय म्हणून. ही त्यांची शंका होती. त्यांनी पोलिसांच्या कानावर हा प्रकार घातला. पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांना देखील यामध्ये काहीतरी काळं बेरं असल्याची चाहूल लागली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना बोलावून खात्री करण्यास सांगितले. क्षीरसागर कसलेले अधिकारी अनेक नामचिन गुंडाना त्यांनी वटणीवर आणून क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करण्याचा दांडगा अनुभव त्यांना.

लोणावळा ग्रामीणचे एसीपी गजानन टोम्पे लोहगडावर दाखल झाले. गडावर प्रवेश करताना एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्यानं आपलं काम अचूक केलं होते. त्यामध्ये एक व्यक्ती टिपली होती. अंगावर हुडी, तोंडाला मास्क, अंगात बर्मुडा, कानाला मोठे हेडफोन. ही व्यक्ती जरा पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यांनी तिच्यावर लक्ष केंद्रित केले. शिवाय कडक उन्हात ही व्यक्ती गडावर असा पेहराव करून का आलीय, हा सवाल कायम होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी सियाचे एका व्यक्तीसोबत दोन हजार चार कॉल झाले असून, दोघे तब्बल २३८ तास फोनवर बोलल्याचे समोर आले. अखेर पोलिसांनी ती व्यक्ती शोधून काढली व तिला ताब्यात घेतले. तिचे नाव होते चेतन चौधरी.

दिवाळीच्या एका कार्यक्रमात सिया आणि चेतनची ओळख झाली होती. प्रथम मैत्री त्यानंतर प्रेमाची पालवी फुटली. मार्केटयार्डतील एका क्रिकेट सामन्यात त्यांचे प्रेमप्रकरण काही लोकांच्या लक्षात आले होते. एव्हाना सियाच्या भावाला देखील त्याची चाहूल लागली होती. सिया आणि चेतन या दोघांनी अगोदरच पोलिसांच्या नजरेतून सुटण्याची खबरदारी घेतली होती. चेतन याने गडावर येताना प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्काचे तिकीट काढले नाही. सुरक्षा रक्षकाने हटकले, तेव्हा आपण व्यायामासाठी आलो असून, जाताना पैसे देतो असे सांगितले. गडावर गेल्यानंतर त्याने अंगातील हुडी काढून बॅगेत ठेवली. केतनचा काटा काढल्यानंतर परत हुडी अंगावर चढवून गडाखाली उतरला. जाताना तो इतरांसोबत बोलत खाली आला. त्यानंतर तो गायब झाला होता.

आता चेतन पोलिसांच्या ताब्यात होता; पण काही केल्याने तो बोलायला तयार नव्हता. ठरलेली उत्तरे देत होता. सिया आणि चेतन या दोघांकडे पोलिस कसून चौकशी करत होते; परंतु ते काही बोलायला तयार नव्हते. पोलिसांनी एकाला भावनिक केले तर दुसऱ्याला दरडावले. तरी हाती काही लागेना. कारण, दोघांनी अगोदरच पोलिसांच्या प्रश्नाला काय उत्तरे द्यायची, गुन्हा दाखल झाला तर शिक्षा काय होऊ शकते, हे सर्च केले होते. शेवटी दोघांनी पोलिसांना केतन हा गडावरून पडला नसून, त्याला आम्ही दोघांनी खाली ढकलून दिल्याचे मान्य केले. सिया, प्रियकर चेतन या दोघांनी केतन याचा खून करण्यासाठी प्रत्येक पावला-पावलावर तयारी केली. परंतु, त्यांचे कृत्य पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. अखेर दोघांचे बिंग फुटले. (उत्तरार्ध)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news