

सुनील कदम
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात ‘एआय’ या नवीन तंत्रज्ञानामुळे पोलिसांच्या हाती जणूकाही हुकमाचा एक्काच आला आहे. अनेक किचकट गुन्हांची उकल करण्यासाठी पोलिसांना एआयची चांगलीच मदत होत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून केरळ पोलिसांनी तब्बल वीस वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या तिहेरी हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना गजाआड केले. त्याची ही चित्तथरारक कथा...
घटना केरळच्या कोल्लम जिल्ह्यातील आंचाल या गावात 2006 साली घडली होती. या गावातील दिवीलकुमार हा भारतीय लष्करात जवान होता आणि त्याची नेमणूक पंजाबातील पठाणकोट येथे होती. सुट्टी मिळताच दिवीलकुमार हा गावी यायचा. याच दरम्यान गावातीलच रंजिनी नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दिवीलकुमार व रंजिनी यांच्या भेटीगाठी वाढू लागल्या. हळूहळू त्यांच्यात शारिरीक संबंधही निर्माण झाले आणि याचा व्हायचा तो परिणाम झाला, रंजिनी ही गर्भवती राहिली. त्यानंतर मात्र दिवीलकुमारने ‘तो मी नव्हेच’ असा पवित्रा घेतला आणि थेट नोकरीच्या ठिकाणी निघून गेला.
इकडे रंजिनीने यथावकाश दोन जुळ्या मुलींना जन्म दिला; पण दिवीलकुमारने ‘या मुली माझ्या नाहीतच, रंजिनी दुसर्याच कुणाचे तरी पाप माझ्या माथी मारत आहे,’ असा पवित्रा घेतला. शेवटी दिवीलकुमारने आपला पत्नी म्हणून स्वीकार करावा, आपल्या मुलींचा पिता म्हणून स्वीकार करावा, यासाठी रंजिनीने न्यायालयात धाव घेतली. मुलींच्या पित्याची निश्चिती करण्यासाठी न्यायालयाने दिवीलकुमार याला ‘डीएनए’ चाचणी करण्यासाठी पाचारण करण्यासाठी फतवा काढला; पण वेगवेगळी कारणे सांगून तो टाळाटाळ करीत होता. पण, आज ना उद्या आपणाला रंजिनी आणि तिच्या मुलींचा स्वीकार करावाच लागेल, ही भीती त्याला सतावत होती. यातून कसा मार्ग काढायचा याचे तो प्लॅनिंग करीत होता. त्यासाठी सैन्यातीलच दुसरा जवान मित्र राजेश याची त्याने मदत घेतली आणि रंजिनी आणि तिच्या मुलींचा काटा काढायचा बेत निश्चित केला.
रंजिनीने जुळ्या मुलींना जन्म दिल्याचा तो सतरावा दिवस होता. एकेदिवशी लष्करातून सुट्टी घेऊन दिवीलकुमार आणि राजेश हे आंचाल या गावी दाखल झाले. दिवीलकुमारने गोड बोलून रंजिनीला तिच्या दोन मुलीसह भेटायला बोलावले. अखेर दिवीलकुमार पत्नी म्हणून आपणाला मुलींस स्वीकारणार, या आनंदात रंजिनीने त्याला भेटायला आपल्याच घरी बोलावले. पण, दिवीलकुमारच्या रूपाने काळच आपणाला साद घालतो आहे, काळालाच आपण भेटीचे निमंत्रण धाडतो आहे, याची त्या बिचारीला जरासुद्धा जाणीव नव्हती. नेमकी त्याचवेळी रंजिनीची आईसुद्धा कामानिमित्त बाहेर गेली होती.
रंजिनीच्या घरात जाताच दिवीलकुमार आणि राजेशने क्षणाचाही उशीर न करता एका झटक्यात रंजिनीचा गळा चिरून तिचा मुडदा पाडला. डोक्यात सैतान संचारलेल्या दोघांनी लगेच आपला मोचा रंजिनीच्या नवजात मुलींकडे वळविला. दोन्ही मुली पाळण्यात शांतपणे झोपल्या होत्या. पण, या दोन नराधमांनी कोंबडीचा गळा चिरावा, तसा त्या दोन कोवळ्या कळ्यांचाही गळा चिरून त्यांचाही बळी घेतला. या तिहेरी हत्याकांडानंतर दिवीलकुमार आणि राजेश हे पुन्हा लष्करात परत न जाता गायब झाले. पालिसांनी जंग जंग पछाडले; पण दोघेही जमिनीत गडप झाल्यासारखे गायब झाले होते. एक ‘कोल्ड ब्लडेड तिहेरी हत्याकांड’ म्हणून केरळ पोलिसांच्या दप्तरी ही केस जवळपास वीस वर्षांपासून पेंडिंग होती.
2025 साली सुरुवातीलाच एका नवीन आणि अत्यंत कर्तबगार अशा पोलिस अधिकार्यांची आंचाल पोलिस ठाण्यात बदली झाली आणि तब्बल वीस वर्षांपासून पेंडिंग पडलेल्या रंजिनी खून प्रकरणाकडे या पोलिस अधिकार्यांचे लक्ष वेधले गेले. काहीही करून या केसचा उलगडा करायचाच, असा त्यांनी चंगच बांधला होता. पण, या प्रकरणातील आरोपी दिवीलकुमार आणि राजेश यांचा शोध म्हणजे एक आव्हानच होते. कारण, गेल्या वीस वर्षांत या दोघांचा त्यांच्या घरच्यांनासुद्धा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यामुळे ही गुंतागुंतीची केस सोडविण्यासाठी त्या अधिकार्यांनी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि पोलिसांचा हा निर्णय तंतोतंत लागू पडला. पोलिसांकडे दोन्हीही आरोपींचे जुने फोटो होते. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून, या फोटोंना ‘एज प्रोग्रेशन’ (काळानुरूप प्रतिमेत होणारा संभाव्य बदल) करण्यात आले, म्हणजे 19 वर्षांनंतर दिवीलकुमार आणि राजेश कसे दिसतील, याचा अंदाज लावला गेला. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विविध हेअरस्टाईल, चेहर्याची वैशिष्ट्ये आणि वयोमानानुसार होणारे बदल करून पोलिसांनी दिवीलकुमार आणि राजेश यांच्या अनेक संभाव्य प्रतिमा तयार केल्या गेल्या. यानंतर या प्रतिमा वेगवेगळ्या समाज माध्यमांवर डाऊनलोड करून समाज माध्यमांवरील लाखो प्रतिमांशी त्याची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी काहीही करून या प्रकरणाचा छडा लावायचाच, असा जणूकाही ठाम निश्चयच केला होता. या शोध मोहिमेत एका लग्नाच्या फोटोमध्ये एका आरोपीच्या एआय तंत्रज्ञानाने तयार केलेल्या प्रतिमेसोबत 90 टक्के साम्य आढळले. हा फोटो आरोपी राजेश याच्याशी मिळता-जुळता होता. समाज माध्यमांद्वारे मिळालेल्या या एका फोटोने तपासाला नवी दिशा दिली. या फोटोच्या आधारे पोलिसांनी राजेशला पुद्दुचेरी येथून शोधून काढले.
त्याने आपले नाव प्रवीण कुमार असे बदलले होते. राजेशच्या मदतीने पोलिसांनी दिवीलकुमारचाही शोध घेतला, ज्याने आपले नाव ‘विष्णू’ असे बदलले होते. अखेर वीस वर्षांनंतर दोघांनाही पुद्दुचेरी येथून अटक करण्यात आली. या घटनेमुळे गुन्हेगारी तपासात एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. विशेषतः, वेगवेगळ्या कारणांनी प्रलंबित पडलेले गुन्हे कलण्यात ते किती प्रभावी ठरू शकते, हे दिसून आले आहे.