

पालघर जिल्ह्यातील मोखाडा म्हटलं की, डोळ्यासमोर येतात डोंगर रांगा, सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा आदिवासी तालुका. शहरीकरण, औद्योगिकीकरण न झाल्याने तसा शांत आणि प्रदूषण मुक्त पावसाळ्यात इथे गेल्यानंतर काय झाडी! काय डोंगर! काय नद्या! असे उद्गार निघाले नाही तर नवलच! शेती हा इथला मुख्य व्यवसाय. आदिवासी समाजाच्या विविध जाती-जमातीची लोक इथं गुण्या -गोविंदाने राहतात. भात-नाचणी तसेच भगर हे इथल्या शेतकर्यांचे मुख्य पीक. काही लोकांनी चक्क स्ट्रॉबेरी देखील या भागात पिकवले आहे. उन्हाळ्यात मात्र पिण्याच्या पाण्याची तुटवडा होतो. येथे अनेक तरुण रोजंदारीसाठी गुजरात मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर यासारख्या शहरांकडे धाव घेतात. मोखाडा हे इथले मुख्य पोलिस स्टेशन. याची एक हद्द ठाणे जिल्ह्याला, दुसरी हद्द नाशिक जिल्ह्याला तर तिसरी हद्द गुजरात राज्याच्या काही भाग तर शेजारील तालुका जव्हार.
सहायक पोलिस निरीक्षक गीते यांची बदली विक्रमगड पोलिस स्टेशन वरून मोखाडा पोलिस स्टेशनला झाली. इतर पोलिस स्टेशन सारखे येथे अट्टल गुन्हेगार नाहीत. काही किरकोळ मारामार्या, रस्त्यावरचा अपघात, चुटपुटच्या घटना इथे घडत असतात. त्यात डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात अनेक पाडे ओस पडलेले असतात. मोखाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून काही मुख्य महामार्ग जात असल्याने या परिसराला तसे महत्त्व आहे. मनोर-त्र्यंबकेश्वर, वाडा खोडाळा मार्गे कसारा-नाशिक या महामार्गावर ती नेहमीच वर्दळ दिसून येते.
फेब्रुवारी महिना होता. एपीआय गीते आपल्या पोलिस ठाण्यात बसलेले असताना सात फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साधारणतः सात वाजण्याच्या सुमारास वैतरणा नदीच्या पात्रात एका महिलेचे मुंडके नसलेले प्रेत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. कारेगाव गावच्या हद्दीतील खोडाळा ते कसाराकडे जाणारा वैतरणा नदीच्या पुलाखाली एका महिलेची मुंडके नसलेली डेड बॉडी दिसून आली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी आपले वरिष्ठ उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे, जव्हार पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अनिल विभुते यांना कळवून पंचनामा करण्याचे काम सुरू केले. पोलिसांच्या नजरेतून बघताच त्यांना ही घटना एक-दोन दिवसांपूर्वी घडलेली असावी, असा अंदाज आला. गुन्हेगाराने मोठ्या शिताफीने खून करून पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मृत व्यक्तीची ओळख पटू नये, यासाठी मुंडके कापून टाकून खोडाळा ते कसारा या मार्गावरील वैतरणा नदीच्या पात्रात मृतदेह टाकून तिथून पसार झाले होते.
मृत व्यक्तीची ओळख पटवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर येऊन पडली होती. अनेक प्रयत्न करून मयत व्यक्तीला कोणीही ओळखत नसल्याने तक्रार करण्यासाठी स्वतः पोलिस पुढे आले. योग्य पंचनामा करून डेड बॉडी सोबत असणारे सर्व पुरावे श्रीरंग आत्माराम शेळके या अंमलदाराने फिर्याद दाखल केली. सर्वात प्रथम या मृत महिलेची ओळख होणे गरजेचे असल्याने तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत पिंगळे यांच्याकडे देण्यात आला.
पालघर स्थानिक गुन्हे शाखा, जव्हार पोलिस उपविभागीय अधिकारी, मोखाडा पोलिस या तपासाच्या मागे लागले होते. नेहमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेने कारेगाव ते खोडाळा रोडवरील मिळेल त्या ठिकाणची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. कसारा इगतपुरी ते घटनास्थळ या परिसरातील घाटेनदेवी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू केले. अगदी मुंबई -आग्रा हायवेवर कसारा घाटच्या खालील बाजूस तर इगतपुरी बाजूचे सीसीटीव्ही फुटेज तासन्तास बसून चेक केले; मात्र हाती काही लागत नव्हते.
घडलेला गुन्हा, महिलेची डेड बॉडी, हाती आलेले पुरावे हे सर्व स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अनिल विभुते, त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र वानखेडे यांच्यासारख्या अधिकार्यांना चॅलेंज होते. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, डी वाय एस पी गणपत पिंगळे यांनी काही करून या आरोपीच्या मुसक्या आवळण्याच्या चंग बांधला होता. तपास विविध बाजूने सुरू होता. जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनमधील मिसिंग व्यक्तींचा शोध सुरू झाला. शेजारील जिल्ह्यातही शोध सुरू झाला. मयत महिलेच्या हातावर ‘ममता’ हे नाव कोरलेले होते. आता मृत व्यक्ती हीच ममता आहे की तिने दुसरे कोणाचे नाव हातावर कोरले होते, हे गूढ पोलिसांसमोर होते. मात्र, मृत व्यक्ती ही ममताच आहे हे गृहीत धरून वीस ते चाळीस वर्षे वयोगटातील मिसिंग हिंदू महिलांचा शोध सुरू झाला. पोलिस सीसीटीएनएस प्रणालीतून शोध घेतला; मात्र हाती अपयश आले.
ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, नाशिक ग्रामीण, नाशिक शहर, अहमदनगर, धुळे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या हद्दीमधील एक जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2024 दरम्यान हरवलेल्या महिलांची माहिती प्राप्त करून त्यांची पडताळणी केली. मात्र, मृत महिलेची ओळख पटवण्यात कुठलीही माहिती कामी आली नाही. मुंबई शहरातील हरवलेल्या महिलांची माहिती घेऊन त्यात देखील तपास केला; मात्र फायदा झाला नाही.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी येथे ममता नावाची एक महिला वेश्याव्यवसाय करत होती. ती गायब असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ती महिला नाशिक शहरात सापडून आली. नाशिक रोड रेल्वे परिसरात ममता नावाची महिला असल्याची माहिती मिळाली. त्यांचा शोध घेता त्या कल्याण येथे जिवंत सापडल्या. ममता नावाच्या महिलांचा तपास करताना पोलिस निफाडपर्यंत गेले. सर्व ठिकाणच्या ममता जिवंत सापडल्या. (पूर्वार्ध)