

काय करू या मुलाचं, काही कळत नाही! कितीही सांगितलं तरी ऐकत नाही... सांगायला गेलं तर उलटा अंगावर धावून येतो आणि वाटेल त्या वस्तू भिरकावून देतो... अंगाला कुठेतरी लागेल, दुखापत होईल, याची कुठलीच काळजी किंवा तमा बाळगत नाही!! कसं करायचं डॉक्टर तुम्हीच सांगा आता... असे सांगणारे पालक जेव्हा काय आणि कसं करू, असे प्रश्न विचारतात तेव्हा एक गोष्ट नक्की झालेली असते की, अशी मुलं-मुली बिघडत चाललेली आहेत आणि ती हाताबाहेर जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे, असे समजावे.
मुले-मुली लहानाचे मोठे होत असताना त्यांच्यावर कोणत्या पद्धतीने संस्कार केले तर ते जबाबदार नागरिक बनतील याचे काही गणित असते. यात एक गोष्ट मात्र महत्त्वाची लक्षात ठेवावी लागेल ती म्हणजे मुलाला जन्मताच कोणताही मेंदुदोष नाही याची खात्री असणे. जेव्हा मुलांची वाढ सुरू होते तेव्हा त्यांची मानसिक वाढ निरोगी पद्धतीने व्हावी, यासाठी आपणाला कशा पद्धतीने संस्कार करायचे त्या पद्धती माहिती असणं गरजेचं आहे; अन्यथा अशी मुले समाज विघातक वर्तन करावयास मागेपुढे पाहत नाहीत.
पहिली संस्काराची पद्धत असते ती म्हणजे कडक शिस्तीचे नियम लादणे. बर्याच वेळा अनेक आया मला असे म्हणत असतात की, ‘याच्या बापाला कधीही मुलांचं काही ऐकायचं नसतं आणि त्यांचं काय चाललंय-काय नाही चाललंय हे बघायचं नसतं; पण काही चुकलं तर मुलांना धरून बडवायचं एवढंच जमतं. मग, सांगा बघू मुलं कशी शहाणी होणार?’ -ही जी पद्धत आहे संस्कार करण्याची ती फक्त बापच करतो असे नाही तर आयादेखील करतात.
या पद्धतीत पहिली गोष्ट म्हणजे बंधने घातली जातात. बंधने घातल्यामुळे मुले सरळ होतील, असा कयास असतो. दुसरी गोष्ट म्हणजे गंभीर अशा शिक्षा अंमलात आणणे. ज्यामध्ये जिभेला चटके देण्यापासून ते एका पायावर दोन-दोन, तीन-तीन तास उभे राहायला सांगणे, वगैरे. हा एकप्रकारचा छळच असतो. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही म्हणू तेच करायचं आणि का करायचं ते विचारायचं नाही, असा अघोरी आदेश असतो. या ठिकाणी पालकांनी आपल्याला असे का करायला लावले असे कोणतेही कारण पालक देत नाहीत. त्यामुळे मुला-मुलींमध्ये मानसिक गोंधळ कायम राहतो.
कडक शिस्तीच्या आई-बाबांमुळे सातत्याने मनात तणाव राहतो. काही वेळा चिडलेपण मनात घर करून राहते. सातत्याने हे करू नकोस, ते करू नकोस, नाही तर मार खाशील, असे म्हणत राहिल्याने प्रचंड अवसानघातकी आज्ञाधारकपणा निर्माण होतो. यातून डिप्रेशन आणि काळजी, विकृती निर्माण होत जाते. तणावाखाली राहिल्याने समाज विघातक विचारसुद्धा डोक्यामध्ये येऊ शकतात. बर्याच वेळा स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात बळावते. त्यातून कोणत्याही कठीण प्रसंगात निसटून जाण्याची प्रवृत्ती, पळ काढण्याची वृत्ती निर्माण होते.
प्रत्येक गोष्ट टाळण्याकडे कल झुकतो. यातून एकटेपणाची, अपराधीपणाची भावना मनात जर रुजली, तर व्यसनांकडे वळण्याचे प्रमाण वाढू लागते. स्वतःमध्ये कोणतीही कौशल्यं नाहीत, संकटांना तोंड देण्याची क्षमता नाही, प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय याची भयंकर जाणीव आहे, अशी जेव्हा मन:स्थिती तयार होते तेव्हा आत्महत्याही घडू शकते. दक्षिण कोरिया, भारत आणि चीन या आशियाई देशांमध्ये अशाप्रकारचे पालकत्व करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच लहान मुला-मुलींमध्ये आत्महत्या करणार्यांचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणावर आढळते.
या पद्धतीच्या संस्कारांमध्ये पालक मुलांकडून अपेक्षा खूपच ठेवतात. त्या व्यक्त करूनही दाखवतात; पण ज्या पद्धतीने मुलांशी वागून त्यांना मदत करून पुढे जायला शिकवणे गरजेचे असते ते काही केले जात नाही. त्यामुळे अशी मुले सर्वस्वी पालकांवर अवलंबून राहतात. चूक काय आणि बरोबर काय याच्यासाठी ते नेहमी पालकांच्या तोंडाकडे बघत राहतात. जेव्हा मोठे होतात तेव्हा अशी मुले-मुली हे आपल्या आई-बाबांचा सल्ला घेण्याचा सपाटा चालू ठेवतात आणि त्यातून गंभीर कौटुंबिक गुन्हे घडत जातात.
स्वतंत्रपणे स्वतः विचार करणे ही गोष्ट करू दिली जात नसल्यामुळे मानसिक अपंगत्व मोठ्या प्रमाणावर निर्माण होते. अशी मुले-मुली ही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायकाच्या प्रभावाखाली आल्यास त्याचे नेतृत्व सहजपणे मान्य करतात व त्याला पाठिंबा देतात. पालकत्वाचे अशाप्रकारचे संस्कार करणे ही गोष्ट अनेक घरांमधून घडत असेल तर ती थांबवणे इष्ट ठरेल. मुला-मुलींवर संस्कार करणारी दुसरीही एक पद्धत असते, तिचा विचार आपण पुढच्या लेखात करूया...