मुलांची अतिकाळजी करणे योग्य आहे का; हेलिकॉप्टर पालकत्व म्हणजे काय?

Juvenile crimes | बाल गुन्हेगारी : मुलांची मानसिक जडणघडण
Pudhari Crime Diary
बाल गुन्हेगारी : मुलांची मानसिक जडणघडण file photo
Published on
Updated on
डॉ. प्रदीप पाटील, (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सेलर)

लहान मुले खोटे बोलतात... हे खोटेपण येते कुठून? लहान मुले हाणामार्‍या करतात.. या हाणामार्‍या कशा निर्माण होतात? लहान मुले फसवतात... आपण त्यांना लबाड म्हणून सोडून देतो! लहान मुले चिडतात, संतापतात आणि रागाच्या भरात वस्तू भिरकावून देतात, तोडतात. अशा प्रकारातून ‘बालगुन्हेगारी मानसिकता’ निर्माण होण्याला अनेक कारणे असतात. त्यातलेच एक कारण म्हणजे मुलांबद्दल अतिप्रमाणात विकृतीयुक्त पझेसिव्ह असणे, त्यांची अतिकाळजी करणे आणि त्यांना अतिप्रमाणात सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणे. (Juvenile crimes)

हेलिकॉप्टर पालकत्व!

या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, काळजी करणे आणि अतिकाळजी करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अतिकाळजी जेव्हा सुरू होते तेव्हा मुलांवर प्रचंड नियंत्रण ठेवले जाते. त्यांच्या बारीक-सारीक गोष्टींवर करडी नजर ठेवली जाते. एवढेच नव्हे, तर आपल्या मुलांनी आपल्या इच्छा व कुवतीप्रमाणे जे जे करायला हवे ते ते सर्व त्यांना करू न देता आपण स्वतःच करायचे आणि त्यांना ते मिळवून द्यायचे. शाळेमध्ये एखादी अ‍ॅक्टिव्हिटी किंवा प्रोजेक्ट सांगितला असेल, तर तो पालकांनीच पूर्ण करून द्यायचा. अशा पद्धतीने जेव्हा पालक वागू लागतात तेव्हा त्याला हेलिकॉप्टर पालकत्व असे म्हणतात.

अपयश पचवायला शिकवा!

या सार्‍यांचा परिणाम काय होतो, तर त्या मुलांमध्ये अनेक दोष पुढे हळूहळू निर्माण होत जातात. सर्वप्रथम एखाद्या संकटाला किंवा समस्येला तोंड कसे द्यायचे याचे कोणतेही कौशल्य त्यांच्यामध्ये निर्माण होत नाही. मानसिकद़ृष्ट्या त्यांच्यामध्ये विचारांचे अपंगत्व तयार व्हायला लागते. मुलांना अपयश येऊ नये म्हणून आपण सर्व करून देऊ लागलो, तर अपयश नावाची चीज काय असते याची ओळखदेखील त्यांना होत नाही. त्यातून स्वतःची इमेज ही फुगवून जिकडे तिकडे सांगितली जाते. त्यातून खोटेपणा तयार होतो. दुसरीकडे आपल्या भावनांवर आपण नियंत्रण कसे ठेवायचे हे न शिकल्याने भावनांवरचा ताबा सुटतो आणि शाळेत व समाजात छोटे-मोठे गुन्हे त्यांच्या हातून घडू लागतात. वास्तवात, मुलांमध्ये जन्मताच मेंदूदोष असतील किंवा व्यंग असले तर तेथे हेलिकॉप्टर पालकत्व उपयोगी पडेलही कदाचित; पण मूल जर सामान्य वृत्तीचे असेल तर तेथे ते हानी करते.

धोकादायक पालकत्व!

जर मुलांना समस्या आणि संकटे यांची ओळख लहानाचे मोठे होत असतानाच जर झाली, तर पुढील आयुष्यात सारे काही गुडी गुडी आहे, हा भ्रम त्यांच्या डोक्यात निर्माण होत नाही. अनेक मुलांना स्वतंत्रपणे काहीतरी करायची इच्छा असते. ती इच्छा त्यांना मनातच ठेवावी लागते. मुलाला किंवा मुलीला काय व्हायचे आहे, हा विचार करण्याचा वाव त्यांना दिला जात नाही. पालकांनी सांगितले म्हणून मनाच्या विरोधात जेव्हा मुले करत राहतात तेव्हा अर्थातच त्यांना अपयश येण्याची शक्यता वाढत जाते आणि त्यातून खोटेपणा, फसवाफसवी, हिंसा अशा मार्गाकडे ते वळतात.

नार्सिसिझमचा धोका!

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हेलिकॉप्टर पालकत्व केलेल्या मुलांमध्ये शारीरिक आजारदेखील उद्भवलेले आहेत कारण मुलांनी काय खावे, कोणता व्यायाम करावा, कधी झोपावे वगैरे कडक नियम पालकांनी पालकांच्या सोयीप्रमाणे केल्याने मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्याचा परिणाम निर्णय घेण्याची क्षमता नाहीशी होण्यावर होतो. सतत दुसर्‍यावर अवलंबून राहण्याची वृत्ती तयार होते आणि काही वेळा तर स्वतःच्याच प्रेमात पडण्याची विकृती तयार होते. ज्याला नार्सिसिझम असे म्हणतात.

गंभीर विचारांची गरज!

हेलिकॉप्टर पालकत्व वाढण्यात हातभार लावणारे दोन घटक महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे मोबाईल आणि दुसरे म्हणजे एकुलते एक मूल असणे. लहान मुलांकडून जेव्हा गुन्हे घडतात, तेव्हा अर्थातच त्यावेळी आपल्या पालकांचे संस्कार करण्याची रीत कशी असते, हे फार महत्त्वाचे ठरते. लहानाचे मोठे होत असताना मुलांवर संस्कार हे जर विवेकी होत असतील तर पुढे गुन्हे होण्याची क्षमता कमी होत जाते. पण याविषयी गंभीर विचार केला जात नाही. तो पालकांनी करावा, एवढेच येथे नमूद करावेसे वाटते.

Pudhari Crime Diary
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पुढाकार आवश्यक : व. पो. नि. बाळकृष्ण कदम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news