

जळगाव : एरंडोल तालुक्यातील माळपिंप्री गावात कीर्तन सुरु असताना याचक्षणी वाढदिवस साजरा करण्यावरून निर्माण झालेल्या वादातून एक गंभीर घटना शुक्रवार (दि.11) रोजी घडली आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या वादात आदिवासी समाजातील युवक राहुल मोरे याला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली.
घटनेच्या दिवशी शुक्रवार (दि.11) रोजी गावात कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असताना काही युवकांनी किर्तनाच्या थोड्या बाजूलाच वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या कारणावरून वाद निर्माण झाला आणि तणावाचे वातावरण तयार झाले. यावेळी वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांकडून देखील गावकऱ्यांना मारहाण झाली, ज्यात एक गावकरी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी गावकऱ्यांनी संबंधित युवकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेनंतर काही दिवसांनी, गावकऱ्यांनी राहुल मोरे या युवकाला अमानुषपणे काठी, बूट, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्याचे डोके फोडण्यात आले असून, शरीरावर गंभीर जखमा करण्यात आल्या आहेत. त्याच्यासोबत इतर काही आदिवासी युवकांनाही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या मारहाणीचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणात पोलीस कारवाईस विलंब झाल्याचा आरोप एकलव्य आदिवासी युवा संघटनेने केला आहे. त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात, राजकीय दबावामुळे तक्रारदारांना पाठीशी घेतले गेल्याचा आरोप केला आहे. दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, गावातील पोलीस पाटील व काही स्थानिक लोकांनी मारहाण करणाऱ्यांना पाठबळ दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असून पोलीस पुढील तपास करत आहेत.