

जळगाव : शहरातील सेंट जोसेफ शाळेजवळ गुरुवार (दि.24) रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात रामानंद नगर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा, कोयता, जिवंत काडतूस आणि दोन रिकामे काडतुसे तसेच इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत.
गोळीबारात गंभीर जखमी युवक महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. पिंप्राळा) हा मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मीनाताई ठाकरे मार्केट येथे आला होता. यावेळी जुन्या वादातून आरोपींनी कोयते आणि गावठी पिस्तूल घेऊन घटनास्थळी येत सपकाळे याच्यावर गोळीबार केला. गोळी त्याच्या कमरेला लागून तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी काही दिवसांतच सहा आरोपींना अटक केली आहे. विशाल भिका कोळी (गावठी पिस्तूलसह), अक्षय उर्फ बाब्या बन्सीलाल धोबी, धिरज उर्फ वैभव उर्फ गोलू कोळी, सागर अरुण भोई उर्फ जाडया भोल्या, नितेश मिलिंद जाधव, गिरिष किशोर घुगे, विशाल कोळी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. संशयित आरोपींवर 11 गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही झाली होती. अक्षय धोबीवर 8 आणि नितेश जाधववर तब्बल 15 गुन्हे नोंद आहेत. या तिघांवर पूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली संदीप वाघ, प्रदीप बोरुडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे पुढील तपास करीत आहेत.