

जळगाव : जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवारी (दि.17) रोजी दौऱ्यावर असल्याने कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांचा दौरा संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्याची पाठ फिरताच दुसऱ्याच दिवशी पहाटे भीषण खून झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.18) रोजी पहाटे सुमारे तीन वाजता सहा ते सात हल्लेखोरांनी एका 26 वर्षीय युवकाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगावात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव विशाल उर्फ विक्की रमेश मोची (वय २६, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे आहे. तो पंचमुखी हनुमान मंदिराजवळील एमएसईबी कार्यालयाजवळ असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने तरुण जागीच कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई सुरू आहे.
विशाल मोची हा सोलर पॅनेल बसविण्याचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ उदय आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट असले तरी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या घटनेमुळे जळगावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.