

जळगाव : जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) विशेष मोहिम राबवून 12 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
डॉ. रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबीच्या 6 पथकांनी 1 जुलै ते 3 जुलै दरम्यान जळगाव जिल्ह्यात विविध भागात छापे टाकून 9 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये वाहनचोरी, ट्रॅक्टर चोरी, मोटारसायकल चोरी व सिगारेट चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
शरद बागल यांच्या पथकाकडून चाळीसगाव व नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यांतून 1.20 लाख किंमतीच्या 2 प्रवासी रिक्षा जप्त केल्या. पिंप्राळा, जळगाव येथून कागदपत्रांशिवाय 3 रिक्षा हस्तगत करण्यात आल्या असून एकूण 3.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
रवि नरवाडे यांच्या पथकाने साकेगाव येथून चोरी गेलेला 3.50 लाख रुपयांचा ट्रॅक्टर जप्त केला. यामध्ये संशयित आरोपी अनिकेत संतोष पाटीलला अटक करण्यात आली.
शेखर डोमाळे यांच्या पथकाने भडगाव येथून 3 1.05 लाख रुपये किमतीच्या मोटारसायकल जप्त केल्या. या गुन्ह्यात संशयित आरोपी शेख इमरान याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर यापूर्वी खून व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
वरणगाव पोलीस ठाण्यातील चोरी प्रकरणातील 45 हजार रुपयांची मोटारसायकल जप्त करण्यात आली. तर पुणे येथून संशयित आरोपी सागर घोडके व इतर तिघांना अटक केली, त्यांच्याकडून 4 लाख रुपयांच्या सिगारेट चोरीप्रकरणी 3 लाख रुपये रोख हस्तगत करण्यात आले.
जळगाव नेरी नाका परिसरातून एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव), अशोक नखाते (जळगाव) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी या गुन्ह्याच्या कारवाईबाबत मार्गदर्शन केले तर एलसीबीच्या एकूण सहा पथकांनी यशस्वीपणे ही कारवाई पार पाडली.