

जळगाव : यावल-चोपडा महामार्गावर पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत १५ हजार रुपयांचा गांजा व एक स्प्लेंडर मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी ही कारवाई पार पाडली.
गुप्त माहितीच्या आधारे यावल-चोपडा रोडवरील फॉरेस्ट कॉलनी परिसरात सापळा रचण्यात आला. त्यात मोटरसायकलवर गांजाची वाहतूक करणारे युसुफ शहा गुलजार शहा (५५, रा. भुसावळ) आणि युनूस सुलतान शेख (५१, रा. भुसावळ, मूळ रा. सुरत) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपासादरम्यान या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी गांजा भानसिंग पुट्ट्या बारेला (रा. वाघझिरा, ता. यावल) याच्याकडून १५ हजार रुपयांना विकत घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करून बारेला यालाही अटक केली. या तिघांवर यावल पोलिस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कारवाईत पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन व इतर पथकातील पोलिसांनी सहभाग घेतला. सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे हे पुढील तपास करत आहेत.