

जळगाव (चिंचोली) : यावल-चोपडा रस्त्यावरील चिंचोली गावाजवळ असलेल्या हॉटेल रायबाच्या मालकावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.10) रोजी रात्री घडली. हॉटेल मालक बाविस्कर यांना दोन गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना तातडीने जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार नेमका कशामुळे झाला आणि कोणी केला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारवडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे यावल परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.