

जळगाव (पाचोरा) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माजी उमेदवार आणि सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी सूर्यवंशी यांनी अमन नावाच्या व्यक्तीविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पोलीस पुढील तपास करत आहेत. तक्रारीनुसार, विधानसभेच्या निवडणुकीपासून अमन हा व्यक्ती विविध मोबाईल क्रमांकावरून सातत्याने संपर्क साधत असून, वैशाली सूर्यवंशी यांना फोनवरून धमक्या देत होता. त्याने ३० लाख रुपये न दिल्यास त्यांची बनावट आक्षेपार्ह क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच निवडणूक आयोग, आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीकडे तक्रार दाखल करण्याची धमकी देखील दिली होती. तसेच, पैसे न दिल्यास समाजात बदनामी करणे, व्यवसायात अडथळे आणणे, आणि त्यांच्या गाडीत ड्रग्ज ठेवून अडचणीत आणण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस पुढील तपास करत आहेत.